नायगाव : चंडिका देवी मंदिर लिफ्ट दुर्घटना प्रकरण; व्यवस्थापकाच्या विरोधात गुन्हा दाखल

वसई: नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथील चंडिका देवी मंदिरात लिफ्ट कोसळून तीन भाविक भक्त जखमी झाले होते. मात्र याविषयी कोणताही गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता. आता या प्रकरणी महिन्याभरानंतर उदवाहक व्यवस्थापकाच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथे आई चंडिका देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. मंदिर हे उंचावर असल्याने वयोवृद्ध व अपंग नागरिकांच्या सुविधेसाठी उदवाहक (लिफ्ट) बसविण्यात आले आहे. १० नोव्हेंबर रोजी ठाणे येथून भक्त देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यातील काही लिफ्टमध्ये वर जात असताना चौथ्या मजल्यावर पोहचताच अचानकपणे लिफ्ट खाली कोसळून दुर्घटना घडली होती. यात प्रमोद सिंग(४६), सुषमा सिंग (४५) व नितीशा सिंग (२२) असे तीन भाविक जखमी झाले होते.
लिफ्टचे व्यवस्थापन करणाऱ्याने देखभाल दुरुस्ती योग्य रित्या केली नसल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचा आरोप सिंग यांनी केला होता. याशिवाय याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली होती. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातून एमएलसी आल्यानंतर नायगाव पोलीसांनी उदवाहक व्यवस्थापक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेतील आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
What's Your Reaction?






