विरार : कौटुंबिक वादातून पित्याकडून चाकू हल्ल्यात जमखी झालेल्या मुलाचा मृत्यू
घर विक्रीतून आलेल्या पैश्याच्या कारणावरून वडीलांचा मुलासोबत वाद झाला होता. यामध्ये पित्याने मुलावर चाकू हल्ला केला होता ज्यात मुलगा गंभीर जखमी झाला होता. मात्र, उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.

विरार - विरार पश्चिमेच्या गोकुळ टाऊनशिप परिसरात काही दिवसांपूर्वी कौटुंबिक वादातून पित्यानेच मुलावर चाकू हल्ला केल्याची घटना घडली होती. सदरं घटनेत २३ वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला नालासोपाऱ्याच्या रिद्धी विनायक हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.मात्र, काल रात्री (१३ डिसेंबर ) त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे रिद्धी विनायक हॉस्पिटलकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०३ हे वाढवून लावण्यात आलेले आहे तसेच मयताचा 'इंक्वेस्ट पंचनामा' करून पोस्टमार्टमकरिता प्राथमिक रुग्णालय, विरार येथे पाठविण्यात आलेला आहे.
काय आहे कौटुंबिक वादाचे प्रकरण ?
विरार पश्चिम येथील गोकुळ टाउनशिपमधील गोकुळ गार्डन सोसायटीत १ डिसेंबर २०२४ रोजी ही घटना घडली होती. या सोसायटीत जोशी कुटुंब वास्तव्यास आहे. मृत मुलाचे नाव जन्मेष जोशी (वय २३ वर्षे )असे आहे. मालाड मधील घर विक्रीतून आलेल्या ४ लाख रुपये वडिलांनी खर्च केल्यामुळे मुलगा जन्मेष जोशी याने वडील परीक्षित जोशी यांना विचारणा केली होती. यावरून दोघांमध्ये वादावादी आणि हाणामारी झाली होती. रागाच्या भरात पित्याने चाकू घेऊन मुलाच्या छातीत वार केला होता. यात जन्मेश गंभीर जखमी झाला होता.
या घटनेची माहिती जन्मेष यांचा भाऊ मित जोशी याने बोळींज पोलीस ठाण्यात दिली होती, त्यानंतर पोलिसांनी परीक्षित जोशी यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १०९ अंतर्गत गंभीर दुखापत करून जीव घेण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र आता मुलाचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात भारतीय न्याय संहिता सन २०२३ चे कलम १०३ हे वाढवून लावण्यात आलेले आहे.
What's Your Reaction?






