पालघरच्या वारली चित्रकारांची चित्रे झळकणार राष्ट्रपती भवनात - राष्ट्रपतींकडून चित्रकारांचा सन्मान

पालघर : राष्ट्रपती भवनातील म्युझियममध्ये पालघर जिल्ह्यातील दोन वारली चित्रकारांची चित्रे झळकणार आहेत. प्रवीण म्हसे हे डहाणू तालुक्यातील गंजाडचे रहिवासी आहेत तर दुसरे चित्रकार कृष्णा भुसारे हे विक्रमगडचे रहिवासी आहेत. २१ ते २९ ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रपतींनी देशातील १५ आदिवासी चित्रकारांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये पालघर जिल्ह्यातील या दोन चित्रकारांचा समावेश होता. यावेळी राष्ट्रपतींकडून या दोन चित्रकारांचा सन्मान करण्यात आला.
१७ ते २० ऑक्टोबर दरम्यान दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटर चित्र प्रदर्शनात दोन्ही चित्रकार सहभागी झाले होते. यावेळी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर, पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना त्यांनी आदिवासींच्या वारली चित्रकलेची माहिती दिली. त्यानंतर २१ ते २८ ऑक्टोबर या काळात राष्ट्रपती भवनात आवासीय कला शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा असून इथे वारली चित्रकलेची खूप मोठी परंपरा आहे. डहाणू तालुक्यातील गंजाड हे गाव वारली चित्रकारांचे गाव म्हणून ओळखले जाते. याच गावचे रहिवासी असलेल्या प्रवीण म्हसे यांच्या दोन चित्रांचा समावेश करण्यात आला आहे तर विक्रमगडचे कृष्णा भुसारे यांनी वारली चित्रांसह राष्ट्रपती भवनाची अशी एकूण पाच चित्रे रेखाटली आहेत. त्यामुळे आता पालघरच्या वारली चित्रांमुळे राष्ट्रपती म्युझियमची शोभा आणखीनच वाढणार आहे.
What's Your Reaction?






