पालघर हत्या प्रकरण उलगडलं: सहा आरोपी अटकेत, एक अल्पवयीन ताब्यात

पालघर, २२ मे – पालघर जिल्ह्यातील तारापूर पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या एका खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवघ्या काही दिवसांत छडा लावत सहा आरोपींना अटक केली असून एक अल्पवयीन मुलगा ताब्यात घेतला आहे.
ही घटना १५ मेच्या रात्री ८ वाजल्यापासून १६ मे रोजी सकाळी ७:२५ वाजेपर्यंत दरम्यान पस्तळ येथील अंबट गोव मैदानात घडली. मृत व्यक्तीची ओळख अभिषेक राम सिंग (३६) अशी असून तो उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्याचा रहिवासी होता. त्याच्या डोक्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार करण्यात आले होते.
सिंग याच्या वडिलांनी राम कलिका सिंग यांनी १६ मे रोजी तारापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ मधील कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेच्या गांभीर्याचा विचार करून पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या तपास पथकांची स्थापना केली. या पथकांनी गुन्हा स्थळाची पाहणी केली, साक्षीदारांचे जबाब घेतले, आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. तपासाचा परीघ वसई-विरार, सुरत (गुजरात), आणि दरभंगा-पाटणा (बिहार) पर्यंत वाढवण्यात आला. तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या मदतीने ठोस माहिती मिळवण्यात आली.
तपासादरम्यान खालील आरोपींना अटक करण्यात आली: भूषण सुरेश धोदी (१९, पस्तळ-सोमनपाडा), केतन रमेश शिनवार (२०, वरंगडे-अटलेपाडा), रोहित संजय कवळे (१९, मानपाडा), दिवेश संतोष सुतार (१८, काटकरपाडा), विशाल नंदू सोमन (२३, सोमनपाडा), आणि साहिल राजेंद्र पवार (१८, सोमनपाडा). तसेच एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
चौकशीत आरोपींनी कबूल केलं की, १५ मेच्या रात्री ते अल्पवयीन आरोपीच्या घरी पार्टीसाठी एकत्र आले होते. मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकलवरून बाहेर पडले असताना त्यांना अंबट गोव मैदानात अभिषेक सिंग झोपलेला दिसला. त्यांनी त्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. अभिषेकने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी पाठलाग करत त्याच्या डोक्यावर लोखंडी सळईने जोरात वार केला. गंभीर जखमेमुळे त्याचा मृत्यू झाला आणि आरोपी घटनास्थळावरून पळून गेले.
या हल्ल्यामागील नेमका हेतू स्पष्ट झाला नसला तरी, पोलिसांनी जुन्या वैरातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला असून सखोल तपास सुरू आहे.
सहा प्रौढ आरोपींना २० मे रोजी अटक करण्यात आली असून, अल्पवयीन आरोपीस बाल न्याय अधिनियमाच्या तरतुदीनुसार कारवाईसाठी बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
What's Your Reaction?






