पावसाळ्यात पाण्याची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी महापालिकेचे आवाहन
वसई-विरार शहर महानगरपालिकेचा नागरिकांना सूचना देत खबरदारीचा सल्ला

वसई, दि. १६ जुलै २०२५ : वसई-विरार शहर महानगरपालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना जलजन्य आजारांपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिर आवाहनानुसार, सद्यस्थितीत शहरात पेल्हार, उसगांव तसेच सुर्या टप्पा-१ व टप्पा-३ आणि MMRDA च्या सुर्या ४०३ द.ल.ली. योजनेतून पाणी पुरवठा केला जात आहे.
पावसाळा सुरू झाल्यामुळे पिण्याच्या पाण्यात दूषिततेची शक्यता वाढते आणि त्यामुळे जलजन्य रोगांचे प्रमाणही वाढू शकते. ही शक्यता लक्षात घेता, महापालिकेने नागरिकांना पाणी गाळून व उकळून प्यावे असा सल्ला दिला आहे.
उप आयुक्त श्री. दीपक झिंजाड यांनी सांगितले की, “महानगरपालिका आपल्या स्तरावरून आवश्यक ती खबरदारी घेत आहे, मात्र नागरिकांनीही दक्षता बाळगणे गरजेचे आहे. पावसाळ्यात आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छ व उकळलेले पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.”
महापालिकेच्या या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि आरोग्यदायी सवयी अंगीकाराव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
What's Your Reaction?






