फुगलेली बॅग, उघड झालेली चोरी – प्रसिद्ध कंपनीचा कर्मचारी लॅपटॉप चोर ठरला

मुंबई, १३ मे : बोरीवलीतील आयटी कंपनीमधून चोरीला गेलेल्या लॅपटॉप प्रकरणाचा उलगडा करत एमएचबी पोलिसांनी एक मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात एका प्रसिद्ध कंपनीत काम करणाऱ्या विवेक साहनी (२५) या युवकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरी गेलेले तब्बल ७ लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
या प्रकरणात विशेष लक्ष वेधून घेतले ते सीसीटीव्ही फुटेजमधील एका दृश्याने. साहनी कंपनीत येताना रिकामी बॅग घेऊन येतो, मात्र जाताना तीच बॅग भरलेली दिसत होती. या छोट्याशा तपशीलावरून पोलिसांचा संशय बळावला आणि अखेर या चोरीचा छडा लागला.
संबंधित आयटी कंपनीत काही दिवसांपूर्वी लॅपटॉप गायब झाल्याचे निदर्शनास आले. सुरुवातीला अंतर्गत तपास केला गेला, परंतु कोणताही ठोस पुरावा न मिळाल्यामुळे अखेर एमएचबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासासाठी कंपनीतील कर्मचाऱ्यांची, तसेच बाह्य सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींची कसून चौकशी केली.
तपासादरम्यान, १८ एप्रिल रोजी देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यासाठी आलेल्या विवेक साहनी याचे सीसीटीव्ही फुटेज पुन्हा तपासण्यात आले. त्यातील बॅगेचा वाढलेला आकार हा त्याच्या संशयास कारणीभूत ठरला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, त्याने लॅपटॉप चोरीची कबुली दिली.
विवेक साहनी हा एका नामांकित कंपनीच्या आउटसोर्सिंग यंत्रणेद्वारे काम करत होता. त्याच्यावर बोरीवलीतील कंपनीतील संगणकांची देखभाल करण्याची जबाबदारी होती. कंपनी मोठी असल्याने तिथे लॅपटॉप, संगणकांचे प्रमाणही मोठे होते. त्यामुळे चोरीची शक्यता कमी भासावी, असा त्याचा गडबडलेला अंदाज होता.
चोरी केलेले लॅपटॉप विकून पैसे मिळविण्याचा त्याचा मानस होता. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश भालेराव, पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील व त्यांच्या पथकाने वेळेवर केलेल्या कसोशीमुळे हा गुन्हा उघडकीस आला. साहनी इतर कंपन्यांमध्येही देखभाल दुरुस्तीच्या निमित्ताने जात होता. त्यामुळे त्याने अशा प्रकारच्या इतर चोऱ्या केल्या आहेत का, याचा पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
What's Your Reaction?






