मिरा भाईंदर शहरात मोफत वाय-फाय सुविधा

भाईंदर :- मिरा भाईंदर शहरात सार्वजनिक ठिकाणी नागरिकांना मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे. यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे.
मिरा भाईंदर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह आधुनिक गोष्टीची उभारणी करण्याकडे प्रशासनाचा कल आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय- फाय सेवा उपलब्ध करून देण्याची संकल्पना पुढे आणली आहे.
यासाठी शहरातील प्रमुख ठिकाणाची निवड केली जाणार आहे.यात प्रामुख्याने उद्यान,अभ्यासिका,सभागृह, शाळा,बस आगार, शासकीय कार्यालय,मैदान व इतर महत्वाच्या ठिकाणाचा समावेश आहे.याशिवाय काही पर्यटक स्थळांना देखील समाविष्ट केले जाणार आहे.शहरात मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिल्यास गरजू विद्यार्थांना अभ्यास करण्यास मदत होईल तर अन्य जणांना शासनाच्या डिजिटल सुविधाचा लाभ घेणे शक्य होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश :-
मिरा भाईंदर शहरात मोफत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एका सल्लागारामार्फत सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून घेतला जाणार आहे. त्या अनुषंगाने निविदा प्रक्रिया राबवून कंत्राटदारामार्फत सुविधा पुरवली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
What's Your Reaction?






