मीरा रोडमध्ये गोळीबार; एकाचा जागीच मृत्यू

मीरा रोडमध्ये गोळीबार; एकाचा जागीच मृत्यू
शम्स सलीम अन्सारी ( ३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मीरा रोडच्या शांती शॉपिंग सेंटरच्या बाहेर साहित्य विकत होता. 

मीरा रोड - मीरा रोड परिसरात धक्कादायक अशी गोळीबाराची घटना घडली असून या गोळीबारात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. आजच मुंबईतील सानपाडा येथे गोळीबाराची घटना घडलेली असतानाच आता मीरा रोड मध्ये अशीच घटना घडली आहे. त्यामुळे मुंबईत अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसते आहे. या गोळीबारामळे मीरा रोड परिसरात खळबळ उडाली आहे. शम्स सलीम अन्सारी ( ३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो मीरा रोडच्या शांती शॉपिंग सेंटरच्या बाहेर साहित्य विकत होता. 

मीरा रोड येथील शांती शॉपिंग सेंटरमध्ये सदरची घटना घडली आहे. अज्ञात व्यक्ती गोळीबार केल्यानंतर घटना स्थळावरून पळून गेला आहे. मात्र, ज्या शम्सवर गोळीबार झाला आणि डोक्याला गोळी लागल्याने गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबार झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्यासह नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमर जगदाळे यांच्या अन्य अधिकारी व कर्मचारी मीराभाईंदर गुन्हे शाखा युनिट एक चे निरीक्षक अविराज कुराडे व अधिकारी कर्मचारी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. ह्या घटनेचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात पाठवला आहे. 

स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखा हल्लेखोराचा शोध घेत असून, उशीरापर्यंत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, नया नगर पोलीस अधिक  तपास करत आहेत.  

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow