वसई, १४ मे: वसई तालुक्यात सहा दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे किनारपट्टी भागातील सुक्या मासळी विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वसई तालुक्यातील पाचूबंदर, किल्लाबंदर, अर्नाळा, नायगाव कोळीवाडा आदी भागांतील मासळी भिजून गेल्याने सुमारे २,५७३ मच्छीमारांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. मासळी व्यवसाय विभागाने याबाबत पंचनामे पूर्ण करून संबंधित अहवाल शासनाकडे सादर केला आहे.

अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वलांडीवर, मोकळ्या आकाशाखाली, तसेच जेट्ट्यांवर व बांबूच्या परातीवर वाळत घातलेली मासळी पूर्णतः खराब झाली. विशेषतः बोंबील, मांदेली, अळी यांसारख्या मासळ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उन्हाळा हा सुकी मासळी विक्रीसाठी सर्वात महत्वाचा हंगाम असल्याने याच काळात नुकसान झाल्याने मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

"आतापर्यंत अडीच हजारांहून अधिक मच्छीमारांचे पंचनामे करण्यात आले असून, शासनाकडे नुकसानभरपाईसाठी अहवाल सादर करण्यात आला आहे," अशी माहिती मच्छी व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी विनोद हारे यांनी दिली.

अवकाळी पावसामुळे सुक्या मासळीची आवक घटल्याने आठवडी बाजारात तीव्र टंचाई जाणवत आहे. अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

"सरकारने मासेमारी व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखा दर्जा दिला आहे. त्यामुळे शेतीप्रमाणेच मासळी विक्रेत्यांनाही नुकसान भरपाई मिळावी," अशी मागणी मच्छीमार संघटनांकडून जोर धरू लागली आहे.

सुक्या मासळी विक्रेत्या महिलांनीही यासंदर्भात आपली व्यथा मांडली असून, पुढील काळ अतिशय कठीण जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.