वसईत आढळलेले ८११ हेक्टरमधील कांदळवन क्षेत्र लवकरच कांदळवन विभागाच्या अखत्यारित येणार

वसईत आढळलेले ८११ हेक्टरमधील कांदळवन क्षेत्र लवकरच कांदळवन विभागाच्या अखत्यारित येणार

वसई - वसईत नुकताच एक सर्वेक्षण करण्यात आले. यातून ८११ हेक्टर जागेत कांदळवन क्षेत्र आढळून आले आहे. कांदळवन क्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे यासाठी स्वतंत्र कांदळवन विभाग तयार करण्यात आला आहे. वसईत आढळलेले हे क्षेत्र आता कांदळवन विभागाच्या अखत्यारित घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. या भागाची खातरजमा करून कांदळवन ताब्यात घेतले जाणार आहे. यामुळे आता वसईतील कांदळवन आता सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे. 

वसई विरार शहरांचा परिसर हा उत्तर कोकणाचा एक भाग आहे त्यामुळे या परिसरात खाडीकिनारे, पाणथळ जागा अशा परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदळवने आहेत. या क्षेत्रापैकी काही क्षेत्र हे महसूल  विभागाच्या अखत्यारित येते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कांदळवने अतिशय महत्वाची भूमिका बजावतात. सागरी किनारपट्टी भागात आढळणारे अनेक पशु पक्ष्यांसाठी ही कांदळवने महत्वाची मानली जातात. मात्र, मागील काही वर्षांपासून  वसई तालुक्यातील कांदळवनाची कत्तल करून अनधिकृत बांधकामे उभारणे, बेसुमार वाळू उपसा करणे, माती भराव करणे सुरू आहे. त्यामुळे खाडीकिनार्‍याच्या भागातील कांदळवन क्षेत्र कमी होत आहे.

कांदळवनांचे संरक्षण आणि कत्तलीविरोधी उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र कांदळवन विभाग स्थापन केला आहे. या विभागाच्या माध्यमातून कांदळवन क्षेत्राचे संवर्धन सुनिश्चित करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कांदळवन क्षेत्राला कांदळवन विभागाच्या देखरेखीत वर्ग केल्यास, यावर विशेष लक्ष देऊन कत्तलीविरोधी कारवाई अधिक प्रभावीपणे करता येईल. यासाठी जिल्हास्तरावर प्रस्ताव सादर केला गेला आहे, आणि सध्या कांदळवन क्षेत्राच्या वितरणाचा आढावा घेतला जात आहे.

वसईच्या महसूल विभागाने अतिक्रमण करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. नायगाव, ससूनवघर, जूचंद्र, शिरगाव आणि नारिंगी यांसारख्या विविध भागांमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात या कारवाईत एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सध्या अजून दहा तक्रारी उपविभागीय कार्यालयात दाखल झाल्या आहेत. महसूल विभागाने याबाबत स्पष्ट केले आहे की, संबंधित तक्रारींची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल. तसेच, कांदळवन कक्षाच्या अंतर्गत कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. कांदळवन क्षेत्राचा सखोल आढावा घेऊन, ते ताब्यात घेण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलली जात आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow