महापालिकेच्या महिला वकिलांची सायबर फसवणूक; ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक

महापालिकेच्या महिला वकिलांची सायबर फसवणूक; ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ५० लाखांची फसवणूक

वसई: सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनेमध्ये वसईतील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वसई विरार महापालिकेतील एका महिला वकिलांची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली सायबर भामट्यांनी तब्बल ५० लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. ही घटना २५ मार्च ते २ एप्रिल दरम्यान घडली असून यावर वसई पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५२ वर्षीय महिला वकील वसई विरार महापालिकेत कार्यरत आहेत. २५ मार्च रोजी त्यांना एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्याने स्वतःला सीबीआय अधिकारी असल्याचे सांगून त्यांना धमकी दिली की त्यांच्या आधार कार्डाचा गैरवापर करून एक मोबाइल वापरण्यात आला आहे आणि त्या मोबाईलद्वारे अश्लील संदेश पाठवले गेले आहेत. त्याचबरोबर दिल्लीत त्यांच्या नावाने एक खाते उघडण्यात आले असून त्यात मनी लॉंड्रींगसाठी निधी जमा झाल्याचे सांगितले.

या फसवणुकीला अधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी, आरोपींनी व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःला सीबीआय अधिकारी दाखवले आणि त्यांच्या समोर खोटे पोलीस ठाण्याचे संकेत दाखवले. भयभीत झालेल्या महिला वकिलांनी २५ मार्च ते २ एप्रिल दरम्यान आरटीजीएसद्वारे विविध खात्यांमध्ये ५० लाख ३८ हजार रुपये ट्रान्सफर केले.

नंतर महिला वकिलांना संशय आला आणि त्यांनी तात्काळ वसई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३१८(४), ३(५) अंतर्गत अज्ञात मोबाईल धारकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.‘डिजिटल अरेस्ट’ हा फसवणुकीचा नवीन प्रकार आहे ज्यामध्ये सायबर भामटे व्हिडिओ कॉलद्वारे विश्वासार्हता निर्माण करतात. ते सांगतात की तुम्हावर परराज्यात गुन्हा दाखल झाला आहे किंवा तुम्ही एखाद्या घोटाळ्यात अडकलेले आहात आणि त्यामुळे ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचे म्हणतात. विश्वास बसावा म्हणून नकली पोलीस ठाणी दाखवली जातात आणि बळींना धमकी देऊन पैसे उकळले जातात.

या प्रकारच्या फसवणुकीच्या तीन घटना अलीकडच्या काही महिन्यांत वसईत घडल्या आहेत.

  • ४ सप्टेंबर २०२४: वसईतील आयटी तज्ञाने सायबर भामट्यांना १ कोटी ४१ लाख रुपये ट्रान्सफर केले.

  • ६ सप्टेंबर २०२४: निवृत्त बँक कर्मचाऱ्यांनी २८ लाख रुपयांची फसवणूक झाली.

पोलीस प्रशासन नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे. कोणत्याही संशयास्पद कॉल किंवा संदेश आल्यास तात्काळ स्थानिक पोलिस किंवा सायबर सेलशी संपर्क साधावा. ही फसवणूक प्रामुख्याने उच्चशिक्षित व्यक्तींना लक्ष्य करते, त्यामुळे सर्वांनी जागरूक राहण्याची आवश्यकता आहे.सायबर फसवणुकीचे प्रकरण नोंदवण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी नागरिकांनी वसई पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow