वसई : जी.जी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते यांच्या 'नेतृत्व पंचविशी' पुस्तकाचे प्रकाशन

वसई - वसईच्या जी. जी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते यांच्या 'नेतृत्व पंचविशी' या पुस्तकाचे प्रकाशन वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसोजा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या सभागृहात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फा. जोएल डीकुन्हा, प्रशांत पाटील, कवी सायमन मार्टिन, महाविद्यालयाचे प्रशासक फा. थॉमस लोपीस, डिंपल प्रकाशनाचे अशोक मुळे, कौतुक मुळे, रिचर्ड वांझ आणि स्थायी समिती माजी सभापती संदेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
'नेतृत्व म्हणजे दुसऱ्यांना जीवन देवून त्यात आनंद भरणे होय. समाज परिवर्तनासाठी पुस्तके महत्वाची भूमिका बजावतात, ''नेतृत्व पंचविशी' हे पुस्तक तरुणाईला उज्वल भविष्याचा मार्ग व नवा विचार देणारे आहे.' असे मत बिशप यांनी यावेळी व्यक्त केले.
डॉ. विभुते हे गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून आजवर त्यांची अर्थशास्त्र या विषयावरील १९ पुस्तके प्रकशित झाली आहेत. 'कोरोना काळात मिळालेल्या वेळेत पुस्तकाचे प्रारूप तयार झाले आणि पुस्तक लेखनाला सुरुवात केली. आजच्या तरुणांमध्ये नेतृत्वगुण विकसित व्हावा यासाठी हे पुस्तक लिहिले आहे.' असे मनोगत डॉ. विभुते यांनी व्यक्त केले. तसेच हे पुस्तक सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लतिका पाटील यांनी तर आभार अमृता विभुते यांनी आभार मानले.
What's Your Reaction?






