वसई रेल्वे टर्मिनसची मंजुरी अजून प्रलंबित; राजकीय घोषणांमध्ये फक्त कागदोपत्रीच प्रगती

वसई रेल्वे टर्मिनसची मंजुरी अजून प्रलंबित; राजकीय घोषणांमध्ये फक्त कागदोपत्रीच प्रगती

वसई : वसई रोड रेल्वे टर्मिनसला मंजुरी मिळाल्याची घोषणा करून राजकीय नेते प्रसिध्दी मिळवत असले तरी प्रत्यक्षात रेल्वे मंडळाने त्याला अजूनपर्यंत परवानगी दिलेली नाही. ही बाब पश्चिम रेल्वेने मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलेल्या पत्रातून उघड झाली आहे.

वसई रोड रेल्वे स्थानकात टर्मिनस तयार करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रवासी करत आहेत. २०१८ मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी टर्मिनसची घोषणा केली होती आणि २०२३ पर्यंत हे पूर्ण होईल असेही जाहीर केले होते. पश्चिम रेल्वेने दोन टप्प्यांमध्ये टर्मिनस तयार करण्याचा प्रस्ताव तयार केला होता. पहिल्या टप्प्यात काही भागाचा विकास आणि दुसऱ्या टप्प्यात पूर्ण टर्मिनस विकसित करणे अपेक्षित होते, यासाठी ३०० हेक्टर जागा हस्तांतरित करावी लागणार होती.

मात्र विविध अडचणींमुळे हे काम अद्याप सुरू झालेले नाही. जागेअभावी नायगाव वसई दरम्यान दिवा मार्गाजवळ किंवा वसई पूर्वेकडे इंडियन ऑईल समोर मिनी रेल्वे टर्मिनस तयार करण्याचा विचार होता. दरम्यान, काही भाजप नेत्यांनी वसईत टर्मिनसला मंजुरी मिळाल्याचे सांगून प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु पश्चिम रेल्वेच्या उपमुख्य प्रबंधक संदीप श्रीवास्तव यांच्या पत्रानुसार वसई रेल्वे टर्मिनसचा केवळ प्रस्ताव रेल्वे मंडळाच्या मान्यतेखाली आहे.

या पत्रामध्ये रेल्वे मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतरच हे काम सुरू होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे भाजपाच्या खोट्या घोषणांचा भंडाफोड झाला आहे.

प्रसिद्ध समाजसेवक जॉय फरगोस यांनी म्हटले की, "प्रसिध्दीपेक्षा नेत्यांनी रेल्वे टर्मिनसला मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत." तर पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी सांगितले की, "रेल्वे मंत्र्यांनी वसई टर्मिनसला मंजुरी दिली आहे, रेल्वे मंडळाची परवानगी ही प्रक्रियेचा एक भाग आहे. काम लवकर सुरू होऊन वसईत रेल्वे टर्मिनस तयार होईल."

वसईतून मोठ्या संख्येने प्रवासी बाहेरगावी जातात, पण त्यांना वांद्रे, कुर्ला, दादर आणि CST रेल्वे स्थानकावर जावे लागते. दररोज १०३ लांब पल्ल्याच्या गाड्या पश्चिम रेल्वेमधून ये-जा करतात, त्यापैकी ४३ ट्रेन मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस स्थानकातून सुटतात. या सर्व गाड्या वसई रोड रेल्वे स्थानकातून जातात.

याशिवाय ६० लांब पल्ल्याच्या गाड्यांचे इंजिन बदलण्याची प्रक्रिया वसई स्थानकात होते, ज्यासाठी ५० मिनिटांहून अधिक वेळ लागतो. दररोज ४० मालगाड्या देखील वसई स्थानकातून जातात. त्यामुळे वसई रोड रेल्वे स्थानकात टर्मिनस तयार करणे ही मागणी अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे.

वसई टर्मिनस तयार झाल्यास पश्चिम रेल्वेवरील इतर टर्मिनसवरील ताण देखील कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे ही मागणी लोकांच्या मनात ताजीच राहिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow