वसई विजयोत्सव यंदा एकाच दिवशी; 12 मे रोजी पार पडणार पारंपरिक मशाल मिरवणूक

वसई, 9 मे 2025: वसई विरार शहर महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागातर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही वसई विजयोत्सवाचा 287 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी होती. 10 मे ते 12 मे 2025 या कालावधीत तीन दिवसीय कार्यक्रम नियोजित करण्यात आलेला होता. मात्र, 6 ते 8 मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे नरवीर चिमाजी अप्पा स्मारक परिसर चिखलमय झाला आहे, तसेच हवामान खात्याने पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तविल्यामुळे, कार्यक्रमात अडथळे येण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, महानगरपालिकेने संपूर्ण विजयोत्सव फक्त 12 मे रोजी एका दिवशी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार, 12 मे 2025 रोजी, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, सकाळी 7:00 वाजता श्री वज्रेश्वरी योगिनी देवी मंदिर, वज्रेश्वरी येथून मशाल प्रज्वलन करून मशाल मिरवणूक मोटारसायकल रॅलीच्या स्वरूपात वसई पारनाका येथे नेण्यात येणार आहे.
मिरवणूक हा मार्ग अनुसरेल: श्री वज्रेश्वरी मंदिर → शिरसाड फाटा → राष्ट्रीय महामार्ग 48 → वसई फाटा → वालीव नाका → रेंजनाका → गोखिवरे नाका → अंबाडी रोड रेल्वे ओव्हर ब्रिज → माणिकपूर → भाबोला → पापडी → तामतलाव → पारनाका → तहसील मार्ग → वसई किल्ला.
सकाळी 11 वाजता नरवीर चिमाजी अप्पा स्मारक येथे पूजन कार्यक्रम होईल, त्यात नरवीर चिमाजी अप्पा यांच्या प्रतिमेला तसेच बुद्ध प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल.
वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनाकडून सर्व नागरिकांना या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जेणेकरून ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा जपली जाईल.
What's Your Reaction?






