वसई-विरार महानगरपालिका मुख्यालयात गणेशोत्सवपूर्व बैठकीत पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन
दि. १३ जून २०२५, विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान मा.आयुक्त तथा प्रशासक श्री. अनिलकुमार पवार यांनी भूषविले.
बैठकीच्या सुरुवातीस उप-आयुक्त श्रीमती अर्चना दिवे यांनी मागील वर्षीच्या गणेशोत्सवासाठी महापालिकेने केलेल्या नियोजनाची आणि विसर्जनाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सन २०२४ मध्ये एकूण ३३,७०१ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते, यातील १९,८५३ मूर्ती कृत्रिम तलाव व फिरते हौद यामध्ये विसर्जित करण्यात आल्या होत्या.
मा.अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या दिशेने महापालिकेने उचललेल्या पावले आणि त्यास नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी पीओपी मूर्तींच्या विसर्जनामुळे नैसर्गिक जलस्रोतांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी शाडू मातीच्या मूर्तींचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.
मा.आयुक्त श्री. अनिलकुमार पवार यांनी उच्च न्यायालयाने दि. ९ जून २०२५ रोजी पीओपी मूर्तींच्या निर्मितीबाबत दिलेल्या निर्देशांची माहिती दिली आणि सर्वांनी त्याचे पालन करण्याचे आवाहन केले. यावर्षी देखील कृत्रिम तलावांत विसर्जनाचे प्रमाण वाढवावे, असे ते म्हणाले.
महापालिका लवकरच मूर्तिकारांना शाडू माती उपलब्ध करून देण्याचे नियोजन करत आहे. तसेच, गणेशोत्सव मंडळांसाठी महापालिका, पोलीस विभाग आणि महावितरण यांच्या एकत्रित ऑनलाईन परवानगी प्रक्रियेची सुरुवात लवकरच केली जाईल.
मंडळांनी वाहतुकीस अडथळा न होणारे मंडप उभारावेत, विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत, आणि उंच मूर्तींपासून होणारे धोके टाळण्यासाठी कमी उंचीच्या मूर्तींचा अवलंब करावा, असे आवाहन आयुक्तांनी केले.
या बैठकीत अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे, उप-आयुक्त, प्र.शहर अभियंता, प्रभाग सहाय्यक आयुक्त, महानगरपालिका अधिकारी, मूर्तिकार, आणि विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. गणेशोत्सव संदर्भातील विविध सूचना आणि अडचणींवर चर्चा झाली व त्यावर तात्काळ उपाययोजनांचे आश्वासन आयुक्तांनी दिले.
या बैठकीचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त श्री. विश्वनाथ तळेकर यांनी केले.
What's Your Reaction?






