वसई-विरार महापालिकेची मोठी कारवाई; एकाच दिवशी ७८,०४६ चौ. फूट अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त

वसई-विरार: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या अनधिकृत बांधकाम व अतिक्रमण निर्मूलन विभागाने ११ सप्टेंबर २०२५ रोजी व्यापक कारवाई करत तब्बल ७८,०४६ चौरस फूट क्षेत्रातील अनधिकृत व अति धोकादायक बांधकामांवर निष्कासनाची कठोर कारवाई केली. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त (उत्तर व दक्षिण) तसेच उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.
महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक प्रभागासाठी एक वरिष्ठ लिपिक आणि चार कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश असलेली विशेष पथके नियुक्त केली आहेत. या पथकांना प्रभागनिहाय कार्यवाहीची जबाबदारी देण्यात आली असून, ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जात आहे.
प्रभाग समिती बी मध्ये नगीनदास येथील सितारा बेकरीच्या समोर आणि मागील भागातील अति धोकादायक इमारतीवर कारवाई करण्यात आली, तर प्रभाग समिती सी मध्ये सहकार नगर येथे G+4 मजली अनधिकृत इमारतीवर निष्कासन करण्यात आले. प्रभाग समिती डी मध्ये तुळींज रोडवरील पारस सोसायटीत अनधिकृत स्लॅब हटवण्यात आले. याशिवाय प्रभाग समिती ई मधील टाकीपाडा, प्रभाग समिती एफ मधील वाकनपाडा, प्रभाग समिती जी मधील कामण-देवदळ, प्रभाग समिती एच मधील डिमेलो वाडी आणि प्रभाग समिती आय मधील उमेळमाण स्मशानभूमीच्या मागील भागातही मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली.
महापालिकेच्या या कठोर कारवाईत केवळ अनधिकृतच नव्हे तर अति धोकादायक ठरलेल्या इमारतींचाही समावेश होता. यामध्ये काही वाणिज्यिक वापरातील चाळी, दुकाने आणि निवासी इमारतींचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, सर्व कारवाया कोणतीही पूर्वसूचना न देता करण्यात आल्या, जेणेकरून बांधकाम करणाऱ्यांना वेळेवर संरचना वाचवता येणार नाहीत.
महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, शहरात कोणतेही अनधिकृत व बिनपरवानी बांधकाम सहन केले जाणार नाही. नागरिकांनी महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता कोणतेही बांधकाम करू नये, अन्यथा अशा प्रकारच्या कारवायांना सामोरे जावे लागेल.
महानगरपालिकेच्या या निर्णायक भूमिकेमुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे आणि सुरक्षित व अधिकृत पद्धतीनेच विकास करावा, असा इशारा महापालिकेने पुन्हा एकदा स्पष्टपणे दिला आहे.
What's Your Reaction?






