वाचकाने लेखकाच्या संवेदनशीलतेशी नातं जोडावं - वीणा गवाणकर

विरार - वाचनसंस्कृतीचा लोप होत असल्याची ओरड असलेल्या आजच्या काळात अधिक जोमदारपणे वाचक चळवळ चालवणे गरजेचे असून वाचकांनी लेखकाच्या संवेदनशीलतेशी नातं जोडायला हवे असे मत सुप्रसिद्ध चरित्रलेखिका वीणा गवाणकर यांनी व्यक्त केले. वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या 'लेखक आपल्या भेटीला' या कार्यक्रमात पुस्तके आणि वाचनाविषयी त्यांनी आपले विचार प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांसमोर मांडले. राज्य शासनाने 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून चरित्रलेखन करणाऱ्या गवाणकर यांनी यावेळी चरित्रलेखनामागील सूत्रही उलगडले. त्या म्हणाल्या, 'एखाद्या समाजाच्या इतिहासाप्रमाणे व्यक्तीचा इतिहासही अत्यंत महत्त्वाचा असतो.' महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांनीही यावेळी आपल्या विद्यार्थीदशेतील वाचनविषयक उपक्रमांच्या विविध आठवणींना उजाळा दिला. तर प्रा. वैखरी नवेले यांनी यावेळी वीणा गवाणकर यांच्या 'एक होता कार्व्हर' या पुस्तकाविषयी आपले विचार व्यक्त केले. सिद्धी मोर्डेकर,स्वरा सावंत आणि गायत्री घडवले या विद्यार्थिनींनी यावेळी स्वरचित कवितांचे आणि कथेचे सादरीकरण केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके, उपप्राचार्या डॉ. दीपा मुर्डेश्वर-कत्रे, उपप्राचार्य प्रा. पी. एम. पगारे यांसह मोठ्या संख्येने प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. सखाराम डाखोरे यांनी केले. तर डॉ. श्रीराम डोंगरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
What's Your Reaction?






