विरार : विरारमधील एका १७ वर्षीय मुलीची झाडफुकीच्या बहाण्याने फसवणूक करून गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी दोन जणांना अटक केली आहे.

पीडितेच्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी तिची भेट २२ वर्षीय स्वयंघोषित गुरु प्रेमा पाटीलशी मंदिरात झाली होती. त्याने स्वतःला तांत्रिक असल्याचे सांगून तिच्यावर वाईट शक्तीचा प्रभाव असल्याचा दावा केला. हा प्रभाव दूर करण्यासाठी विशिष्ट ‘उपचार’ करण्याची गरज असल्याचे तो सांगत असे.

३० जुलै रोजी प्रेमा पाटील आणि त्याचा मित्र करण पाटील यांनी तिला राजोड़ी बीच परिसरातील एका लॉजमध्ये नेले. घटनेनंतर मुलीने हा प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला आणि तिच्या सल्ल्यानुसार पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

या प्रकरणी विरार पोलिसांनी दोघांविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ आणि महाराष्ट्र मानव बलिदान, इतर अमानुष व अघोरी प्रथा व काळ्या जादूचे उच्चाटन अधिनियम २०१३ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.