सर्वोत्कृष्ट तपास करणार्या पोलिसांचा आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते सन्मान

वसई- नोव्हेंबर महिन्यातील गुन्ह्यांचा सर्वोत्कृष्ट तपास कऱणार्या आयुक्तालयातील पोलीस अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात निवडणूक काळात शस्त्रसाठा पकडणारे गुन्हे शाखा २ तसेच बेकायदेशीर मोबाईल नेटवर्कचा चालवणा्र्या टोळीचा छडा लावणार्या गुन्हे शाखा ३ चा समावेश आहे. तसेच निवडणुकीत दिड कोटींची बेहिशोबी रोकड जप्त करणार्या नयानगर पोलिसांनाही गौरविण्यात आले.
दर महिन्यात सर्वोत्कृष्ट तपास करणार्या पोलिसांना आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते सर्वोत्कृष्ट तपासाच्या पुरस्काराने गौरविण्यात येते. नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट तपासाचे पुरस्कार विविध पोलिसांना प्रदान करण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत घातपात घडविण्यासाठी रचण्यात आलेला कट गुन्हे शाखा २ च्या पथकाने उधळून लावला होता. पोलिसांनी विविध ठिकाणी कारवाई करून ९ देशी पिस्तूल, २१ जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करून ८ जणांना अटक केली होती. या कामागिरीबद्दल गुन्हे शाखा २ चे प्रमुख शाहूराज रणवरे यांना उत्कृष्ट तपासाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने समांतर बेकायदेशीर मोबाईल नेटवर्क उघडकीस आणले होते. मोबाईल टॉवरमधून रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी लावण्यात येणारे यंत्र (आझना कार्ड) चोरी करणार्या एका आंतरराष्ट्रीय टोळीला अटक करण्यात आली होती. या यंत्राचा वापर परदेशातून गुन्हेगारी कृत्यासाठी करण्यात येत होता. या तपासाबाबत गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांना गौरविण्यात आले.
यावेळी इतरही गुन्हे प्रकरणामध्ये सर्वोत्कृष्ट टॅप तपास करणाऱ्या अन्य पोलिस अधिकाऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला. यात मध्यवर्ती गुन्हे शाखेचे राहुल राख, तुळींज पोलीस ठाण्याचे प्रमोद तावडे, नालासोपारा पोलीस ठाण्याचे विशाल दळवी आणि नया नगर पोलीस ठाण्याचे अमर जगदाळे यांचा समावेश आहे.
What's Your Reaction?






