नालासोपाऱ्यातील टाकी रोड परिसरात वाहतूक कोंडीची समस्या
अनधिकृत पार्किंगला प्रतिबंध करण्याची माजी नगरसेवक किशोर पाटील यांची मागणी

नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब` अंतर्गत मोरेगाव रॉक गार्डन तलाव ते टाकी रोडपर्यंतचा रस्ता अत्यंत रहदारीचा आहे. या रस्त्यालगत अनेक शाळा आणि रुग्णालये आहेत. परंतु मागील काही महिन्यांपासून या रस्त्यालगत अनेक ट्रक, टॅक्सी, रिक्षा आणि गॅस सिलिंडरची वाहने उभी करण्यात येत आहेत. किराणा माल घेऊन येणारे टेम्पोदेखील सकाळच्या वेळात या ठिकाणी उभे करून किराणा मालाच्या दुकांनात बिनदिक्कत माल डिलेव्हरी करत असतात. याचे परिणाम म्हणून या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी होते. शाळांत जाणारे विद्यार्थी आणि कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचा त्यामुळे खोळंबा होतो. त्यातून त्यांच्या वेळेचा अपव्यय आणि आर्थिक नुकसानही होते.
या समस्येवर माजी नगरसेवक किशोर पाटील यांची महापालिकेचे व वाहतूक पोलीस निरीक्षकांचे लक्ष वेधले आहे. रस्त्यालगत ट्रक-टॅक्सी-रिक्षांना पार्किंगकरता प्रतिबंध करावा, अशी आग्रही मागणी पाटील यांनी केली आहे. या संदर्भात सोमवार, 9 डिसेंबर रोजी वसई-विरार महापालिका आयुक्त व वाहतूक पोलीस निरीक्षक वसई यांच्यासोबत किशोर पाटील यांनी पत्रव्यवहार करून ही समस्या सोडविण्याची विनंती केली आहे.
हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावून संबंधित वाहनधारकांना नोटिसा बजावून या ठिकाणच्या अनधिकृत पार्किंगला प्रतिबंध करण्यात यावा; तसेच रहदारीस जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करून हा रस्ता वाहतुकीस मोकळा करण्यात यावा, अशीही मागणी माजी नगरसेवक किशोर पाटील यांनी केली आहे.
What's Your Reaction?






