विरार - वसई विरार शहर महानगरपालिकेकडून काही वर्षांपूर्वी पोलिसांना शहरात गस्त घालण्यासाठी वाहने देण्यात आली होती. शहरातील पोलीस ठाण्यांना वाहनांचा तुटवडा असल्याने ही वाहने पालिकेकडून पोलिसांना देण्यात आलेली होती. तत्कालीन पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांच्या उपस्थितीत वसई तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यांना बोलेरो कंपनीची १७ वाहने गस्तीसाठी देण्यात आली होती. त्यासाठी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र सध्या हीच वाहने वापरा विना भंगारात पडून असल्याचे चित्र आहे. 

वसई-विरार शहरातील पोलीस ठाण्यांना पूर्वी पुरेशी वाहने उपलब्ध नसल्याने, तसेच आरोपी ने - आण करणे, गस्त घालणे या कामांसाठी वाहनांची कमतरता भासत असे यामुळे ही वाहने पुरवली होती. तसेच पालिकेने दिलेली वाहने महिला पोलिसांच्या भरारी पथकासाठी २४ तास उपलब्ध असत. मात्र, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर आयुक्तालयाकडून पोलीस ठाण्यांना नवी वाहने दिली गेली त्यानंतर पालिकेने दिलेल्या वाहनांचा वापर कमी होऊ लागला व हळहळू ती वापरातून हद्दपार होऊन तशीच पडून राहिली. 

पालिकेकडून देण्यात आलेल्या वाहनांची दुरुस्ती आणि देखभाल करण्याची जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची होती मात्र योग्य वेळी वाहनांची दुरुस्ती न केल्यामुळे ती नादुरुस्त जवळजवळ भंगारात जमा झालेली आहेत.  

याबाबत वसई पोलीस ठाण्याचे नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांना विचारणा केली असता, सदरची वाहने नादुरुस्त झालेली आहेत. त्यामुळे वापरण्या योग्य नाहीत. पालिकेला ती परत केली परंतु, त्यांच्याकडे जागा नसल्याने पोलीस ठाण्यातच वाहने पडून आहेत. अशी माहिती दिली.