हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र पालिका मुख्यालयात लावा!

विरार : वसई-विरार महापालिकेच्या नव्याने झालेल्या मुख्यालयात हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे व विरार गावचे सुपुत्र आण्णासाहेब वर्तक यांची तैलचित्रे, तर पद्मश्री भाऊसाहेब वर्तक व माजी राज्यमंत्री तारामाई वर्तक यांच्या तसबिरी लावण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख सुदेश चौधरी यांनी केली आहे. या मागणीनिमित्ताने त्यांनी सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ यांच्यासोबत आज दुपारी (26 ऑगस्ट) वसई-विरार महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांची भेट घेतली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे देशाच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात अमूल्य योगदान आहे. उभ्या महाराष्ट्राचे ते प्रेरणास्थान आहेत. त्याच प्रमाणे विरार गावचे सुपुत्र पद्मश्री आण्णासाहेब वर्तक, त्यांचे पुत्र भाऊसाहेब वर्तक आणि माजी राज्यमंत्री तारामाई वर्तक यांचेही वसई-विरारच्या राजकारणात महत्त्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. किंबहुना येथील शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी दखलघेण्याजोगी कामगिरी केलेली आहे. आज त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यामुळे हजारो गरीब-गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत.अनेकांनी या ज्ञानार्जनातून विविध क्षेत्रांत आपला नावलौकिक प्राप्त केलेला आहे. त्यामुळे या तिघांचेही कायम स्मरण राहावे; तसेच भविष्यातील पिढीला या महनीय व्यक्तींकडून प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांच्या आठवणी पालिका मुख्यालयात असणे आवश्यक आहे. किंबहुना वसई-विरार महापालिकेने त्यांच्या सन्मानार्थ त्यांची तैलचित्रे व तसबिरी पालिका मुख्यालयात लावावीत, अशी विनंती शिवसेना (बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख सुदेश चौधरी यांनी केली आहे.
दरम्यान; समाजवादी नेते तथा माजी आमदार पंढरीनाथ चौधरी यांचेदेखील स्मारक व्हावे व त्यांचे नामकरण केलेल्या रस्त्याची नोंद पालिकेने अधिकृतरीत्या आपल्या दफ्तरी करून घ्यावी, अशी मागणीही चौधरी यांनी केली. विशेष म्हणजेे;याआधी वसई-विरार महापालिकेने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर चिमाजी आप्पा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तैलचित्रे लावून मुख्यालयाची सुंदरता वाढविलेली आहे.
या शिष्टमंडळात शहरप्रमुखउमेशदादा गोवेकर, नगरसेविका पुतुल झा, शहर सचिव रोशन चोरगे, शहर संघटक पद्मा जाधव, उपशहरप्रमुख चंद्रशेखर साटम, उपशहर संघटक मंगला मोंडे, विभागप्रमुख अस्लम पठाण, विभाग संघटक आदिती घाडी, उत्तर भारतीय शहरप्रमुख आशुतोष झा आदी मान्यवर उपस्थित होते.
What's Your Reaction?






