वसई:नालासोपारा परिसरात नायजेरियन नागरिकांना घरे भाड्याने देणाऱ्यांविरोधात आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अमली पदार्थांच्या वाढत्या प्रकरणांमध्ये नायजेरियन नागरिकांचा सहभाग आढळून आल्याने, त्यांना आश्रय देणारे घरमालक आता थेट पोलिसांच्या रडारवर आले आहेत. याच पार्श्वभूमीवर तिघांविरोधात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तुळींज पोलिसांनी मागील आठवड्यात तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे १० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची जप्ती केली होती. या प्रकरणांमध्ये नायजेरियन नागरिकांचा सहभाग समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्याबरोबरच त्यांना घर उपलब्ध करून देणाऱ्यांवरही कारवाईचा निर्णय घेतला.

पोलिसांच्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेतील मोरेगाव येथील प्रियांका अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक ३०९ चे मालक मस्तान शेख, तसेच प्रगतीनगर येथील अंशित प्लाझामधील दोन फ्लॅट्सचे मालक संजय थोरात आणि निला वाघमारे यांनी नायजेरियन नागरिकांना घरे भाड्याने दिली होती, मात्र याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती दिली नव्हती.

यामुळे त्यांच्या विरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम १८८, रिपोर्ट टू पोलीस ऑर्डर १९७१ मधील नियम २ आणि विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ च्या कलम १४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, विदेशी नागरिकांना घर भाड्याने देताना ‘सी फॉर्म’ भरून पोलिसांचा ना हरकत दाखला घेणे कायदेशीर बंधनकारक आहे. परंतु नायजेरियन नागरिकांकडून अधिक भाडे मिळत असल्याने काही मालक नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत. हे गंभीर स्वरूपाचे उल्लंघन असून भविष्यात असे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

"नायजेरियन नागरिकांना घरे भाड्याने देताना खातरजमा करावी आणि पोलिसांना माहिती द्यावी. जे नागरिक माहिती दडवून ठेवतील अशांवर कठोर कारवाई केली जाईल."

— वसई-विरार पोलीस प्रशासननायजेरियन नागरिकांना अमली पदार्थांच्या व्यवहारात सामील असल्याचे समोर येत असल्याने, त्यांना भाड्याने घरे देणाऱ्या घरमालकांविरोधात आता थेट कायदेशीर कारवाई केली जात आहे. यामुळे घरमालकांनी आता अधिक जागरूक राहण्याची गरज निर्माण झाली आहे.