नालासोपारात परदेशी नागरिकांवर मोठी धडक कारवाई १३० हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

नालासोपारात परदेशी नागरिकांवर मोठी धडक कारवाई  १३० हून अधिक जण पोलिसांच्या ताब्यात

नालासोपारा | ०६ फरवरी २०२६

नालासोपारा परिसरात परदेशी नागरिकांची संख्या वाढत असल्याच्या तक्रारींनंतर पोलीस प्रशासन आणि वसई-विरार महानगरपालिकेने संयुक्त कारवाई सुरू केली आहे. बेकायदेशीररित्या वास्तव्यास असलेल्या आणि परवानगीशिवाय व्यवसाय करणाऱ्या नागरिकांविरोधात ही कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत १३० हून अधिक परदेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वसई-विरार भागात गेल्या काही वर्षांत नायजेरियन नागरिकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अमली पदार्थांची तस्करी तसेच इतर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये काही नायजेरियन नागरिकांचा सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे अवैधरीत्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे.

नालासोपारा पूर्वेकडील प्रगती नगर, अग्रवाल परिसर आणि आसपासच्या भागात परदेशी नागरिकांच्या मोठ्या वस्त्या असल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळेस या भागात बेकायदेशीर हालचाली वाढतात, ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. दादागिरी आणि असामाजिक प्रकारांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असल्याच्या तक्रारी आहेत.

तपासादरम्यान असे आढळून आले की, अनेक परदेशी नागरिकांकडे वैध पासपोर्ट व व्हिसा नाहीत. तसेच काहींनी इमारतींमध्ये अवैधरित्या ताबा घेतला असून कोणतीही परवानगी न घेता दुकाने व व्यवसाय सुरू केले आहेत. नालासोपारा परिसरात गुमास्ता परवान्याशिवाय सुमारे ४० दुकाने सुरू असल्याचेही समोर आले आहे.

या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आणि महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत घरांची झडती घेतली जात असून पासपोर्ट आणि व्हिसाची तपासणी सुरू आहे.

परिमंडळ-२च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी सांगितले की, नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत होत्या. त्याच तक्रारींच्या आधारे ही कारवाई राबवण्यात येत आहे. आतापर्यंत विविध देशांतील १०९ हून अधिक परदेशी नागरिकांची चौकशी करण्यात आली असून कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow