परिवहन विभागाची कडक कारवाई; २४० रिक्षांवर छापेमारी, ४५ जप्त

वसई, २२ मार्च २०२५ – वसई विरार शहरातील अनधिकृत व नियमबाह्य पद्धतीने चालविल्या जाणाऱ्या रिक्षांविरोधात प्रादेशिक परिवहन विभागाने जोरदार कारवाई सुरु केली आहे. विशेषत: रात्रीच्या सुमारास ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. मागील पाच दिवसांत २४० रिक्षांवर कारवाई करून ४५ रिक्षा जप्त करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली.
वसई विरार शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार रिक्षांची संख्या विस्फोटक प्रमाणात वाढली आहे. परवाने खुले झाल्यानंतर, रिक्षांची संख्या जास्त प्रमाणात रस्त्यावर धावू लागली आहे. मात्र, यामध्ये अनेक रिक्षा अनधिकृत व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत, ज्या कधीही कागदपत्रांशिवाय चालविल्या जात आहेत. हे रिक्षाचालक विशेषतः रात्रीच्या वेळी रिक्षा चालवताना पकडला जाऊ नये, म्हणून बाहेर पडतात. यामुळे शहरात नियमबाह्य रिक्षांची संख्या वाढली आहे, आणि अशा रिक्षा चालकांच्या कृत्यांमुळे मारामारी, अरेरावी यासारख्या घटना घडत आहेत.
परिवहन विभागाकडे अशा अनधिकृत रिक्षांविरोधात नागरिक व विविध सामाजिक कार्यकर्त्यांकडून सतत तक्रारी येत होत्या. त्यामुळे, विभागाने रात्रभर काम करणारी विशेष पथके तयार केली असून, रिक्षांची तपासणी सुरू केली आहे. तपासणी दरम्यान रिक्षा चालकांकडून परवाना, बॅच, कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. पाच दिवसांत ७३२ रिक्षांची तपासणी करण्यात आली, त्यापैकी २४० रिक्षा दोषी ठरल्या आणि त्यातील ४५ रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर १७ लाख ६७ हजार रुपये दंड वसूल करण्यात आले आहेत.
प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले की, "अशा अनधिकृत रिक्षांना पायबंद घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. आणि भविष्यात यासाठी आणखी कडक कारवाई केली जाईल."
वसई विरार शहरात अनेक बाहेर राज्यातील रिक्षा चालक मोठ्या प्रमाणावर आहेत, ज्यात काही चालक गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. यामुळे रात्रीच्या वेळी मद्यपान करून धिंगाणा घालणे, प्रवाशांशी दादागिरी करणे अशा घटनाही समोर येत आहेत. नागरिकांची मागणी आहे की, अशा रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करावी, ज्यामुळे सर्वसामान्य रिक्षाचालक व प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.
परिवहन विभागाच्या कारवाईमुळे वसई विरार शहरातील अनधिकृत रिक्षांची संख्या कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
What's Your Reaction?






