मिरा-भाईंदरमध्ये मीठ शेती संकटात; उत्पादनात ६६ टक्के घट

भाईंदर, २७ मे : मिरा-भाईंदर परिसरात सुरू असलेल्या अवकाळी आणि मान्सूनपूर्व पावसामुळे येथील पारंपरिक मीठ शेतीला मोठा फटका बसला आहे. या वर्षी मीठ उत्पादनात तब्बल ६६ टक्के घट झाली असून अनेक मिठागरे वेळेपूर्वीच बंद करण्याची वेळ उत्पादकांवर ओढवली आहे. परिणामी, या क्षेत्रातील उत्पादक आणि मजूर आर्थिक संकटात सापडले आहेत.
मिरा-भाईंदर भाग खाडी आणि समुद्रकिनारी वसलेला असल्याने येथे खारपाण जमिनीवर अनेक वर्षांपासून मीठ शेती केली जाते. या भागात प्रामुख्याने कुपा, वजनी आणि कर्कज प्रकारचे मीठ तयार होते. कुपा मीठ घरगुती वापरासाठी, वजनी मीठ बर्फ कारखान्यांसाठी, तर कर्कज मीठ कापड आणि रसायन उद्योगात वापरले जाते. त्यामुळे येथे तयार होणाऱ्या मिठाला बाजारात मोठी मागणी असते.
सामान्यतः नोव्हेंबर ते जून या काळात मीठ शेती केली जाते. त्यात मे महिना सर्वाधिक उत्पादन देणारा मानला जातो, कारण या काळात साधारण ६६ टक्के मीठ तयार होते. मात्र यंदा मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे मिठागरात पाणी साचले आहे. त्यामुळे उत्पादन थांबवावे लागले असून मिठागरे बंद करण्याची वेळ आली आहे.
मीठ उत्पादक शांत शाह यांनी सांगितले की, "यंदा मीठ शेतीचा संपूर्ण हंगाम फसला असून मजुरांचे वेतन, साहत्यांची खरेदी आणि इतर खर्च मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे."
ही शेती पारंपरिक पद्धतीने केली जाते आणि त्यासाठी विशेष कौशल्य आवश्यक असते. हे कौशल्य प्रामुख्याने आदिवासी समाजातील विशिष्ट मजुरांमध्येच आहे. मागील काही वर्षांपासून नव्या मजुरांची आवक कमी झाल्याने मजुरांचे वेतनही वाढले आहे. त्यामुळे यंदाचा तोटा उत्पादकांवर अधिकच घातक ठरू शकतो.
अवकाळी पावसामुळे मीठ उत्पादकांचे नुकसान लक्षात घेता, शासनाने आर्थिक मदतीची घोषणा करावी, अशी मागणी स्थानिक उत्पादक आणि शेतकऱ्यांनी केली आहे.
What's Your Reaction?






