येत्या २ दिवसात ठोस कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करणार

विरार : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक आणि महावितरण विभागाच्या अनागोंदी आणि गलथान कारभाराविरोधात येत्या २ दिवसांच्या कालावधीत ठोस कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे सुरु असलेले आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षच्या वतीने देण्यात आला आहे. दिनांक ०२ ऑक्टोबर या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून नालासोपारा शहर युवा संघटक चंदू पाटील यांनी धरणे आंदोलन सुरु केले आहे. आज आंदोलन सुरु करून सुमारे १३ दिवसांचा कालावधी लोटला आहे. मात्र प्रशासन ठम्म असून केवळ बघ्याची भूमिका बजावत आहे.
भूमाफियांच्या अनधिकृत आणि धोकादायक बांधकामांना संरक्षण देऊन त्यांना चुकीच्या पद्धतीने वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येऊन त्यांचे जीव टांगणीवर आहेत. कोणत्याही क्षणी एखादी दुर्दैवी घटना घडून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता असल्यामुळे या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मान. जिल्हाधिकारी यांना सविस्तर सविस्तर निवेदन सादर करून बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली. भूमाफिया शासनाच्या महसूल विभागाची फसवणूक करीत आहेत. शासनाच्या आणि अनुसूचित जमातींच्या जमिनी बळकावून, बनावट मोजणी नकाशे सादर करून कोट्यावधीचा महसूल बुडवीत आहेत. विशेष बाब म्हणजे याकडे महसूल विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.
वसई तालुक्यातील तुंगारेश्वर या इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे व धोकादायक कारखान्यांमुळे वन्यजीवांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. येथील रॉयल इंडस्ट्रिअल हब मधील कारखान्यांना वीज पुरवठा करणेकामी महावितरण कंपनी वसई मंडळ यांनी बांधलेले स्विचिंग स्टेशन हे नैसर्गिक नाल्याच्या जागेवर बांधण्यात आले आहे. सदर जात इनाम वतन जमिनींचे नोंदणीकृत दस्तऐवजांद्वारे कारखानदारांना हस्तांतरण झाल्याची गंभीर आणि धक्कादायक बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. मात्र जिल्हा प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करण्याच्या मनस्थितीत दिसून येत नाही.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन छेडल्यानंतर वीज मंडळाकडून वीज जोडण्या खंडित करण्यासंदर्भात थातुरमातुर कारवाई झाली असली तरी मात्र कारखानदारांनी जनरेटर लावून आपल्या कंपन्या सुरूच ठेवल्या आहेत. अशा पद्धतीने नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आणून मनमानी आणि अनागोंदी कारभार सुरूच आहे. जिल्हा महसूल प्रशासनाचे, महावितरणचे, वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासनाचे आणि जिल्हा निबंधक कार्यालयाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
येत्या २ दिवसांच्या कालावधीमध्ये प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर या ठिकाणी सुरु असलेले आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
What's Your Reaction?






