वसई-नालासोपारा शाळेत १४ वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार: मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांविरोधात पोक्सोच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल

वसई-नालासोपारा, २० ऑगस्ट (HS): वसई-नालासोपारा येथील यादवेश विकास इंग्रजी शाळेत १४ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाने केलेल्या बलात्कार प्रकरणानंतर १० दिवसांनी मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांविरोधात पोक्सोच्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पीडित विद्यार्थिनीने आपल्या लैंगिक छळाबाबत शाळेच्या मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांना माहिती दिली होती, मात्र त्यांनी कारवाई करण्याऐवजी पीडितेच्याच भावाला मारहाण केली.
या शाळेत ९वीत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवर शाळेतील शिक्षक अमित दुबे मागील ५ महिन्यांपासून धमकावून बलात्कार करत होता. पीडितेच्या तक्रारीनुसार, २०२२ मध्येही दुबेने तिचा लैंगिक छळ केला होता. याबाबत पीडित विद्यार्थिनीने पर्यवेक्षक संतलाल यादव आणि मुख्याध्यापक विकास यादव यांना सांगितले होते, पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
पीडितेच्या भावाने शाळेत विचारणा केल्यावर मुख्याध्यापक विकास यादव यांनी त्याला मारहाण केली होती. जर शाळेने त्वरित कारवाई केली असती, तर त्याच्या बहिणीवर बलात्कार झाला नसता, असे पीडितेच्या भावाने म्हटले आहे.
या प्रकरणात पेल्हार पोलिसांनी आरोपी अमित दुबेवर भारतीय न्याय संहितेच्या आणि पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करून अटक केली आहे. दुबेने विद्यार्थिनीला शिकवणी वर्गाच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. पीडितेच्या भावाने दावा केला आहे की, शाळेत २५ हून अधिक मुलींवर अशाप्रकारे लैंगिक अत्याचार झाले आहेत. या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) नेमून चौकशी करण्याची मागणी होत आहे.
What's Your Reaction?






