हाऊस अरेस्ट’ फेम एजाज खानवर स्पर्धक अभिनेत्रीने केला बलात्काराचा आरोप, आणखी एक गुन्हा दाखल

मुंबई- उल्लू ॲप वरील वादग्रस्त रिॲलिटी शो ‘हाऊस अरेस्ट’चा निवेदक एझाज खानयाच्याविरोधात याच शो मधील एका ३० वर्षीय स्पर्धक अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप केला आहे. त्याच्याविरोधात चारकोप पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो सध्या फरार आहे. दरम्यान, हाऊस अरेस्ट मधील अश्लील कृत्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी त्याला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
एझाज खान हा अभिनेता असून सलमान खान निवेदक असलेल्या बिग बॉसच्या सातव्या पर्वातून चर्चेत आला होता. सध्या वादात सापडलेल्या ‘हाऊस अरेस्ट’ या ‘उल्लू’ ॲपवरली रिॲलिटी शो चा तो निवेदक (होस्ट) आहे. या शो मधून अश्लीलता पसरविण्याचा त्याच्यावर आरोप आहे. महिला स्पर्धकांशी अश्लील संभाषण करणे, अश्लील कृत्य करायला भाग पडणे आदी कारणांमुळे तो वादात सापडला होता. याप्रकरणी बजरंग दलाच्या तक्रारीवरून एझाज खान आणि शोच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ३(५), माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६७ (अ), स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण (प्रतिषेध) अधिनियम १९८६ च्या कलम ४, ६ आणि ७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हाच एझाज खान आता बलात्काराच्या आरोपांमुळे पुन्हा वादात सापडला आहे. ‘हाऊस अरेस्ट’ या रिॲलिटी शो मधील एका ३० वर्षीय स्पर्धक अभिनेत्रीने त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. तक्रारदार अभिनेत्री मूळची गुजराथची असून कांदिवली येथे राहते. उल्लू ॲपचे मालक विभू अग्रवाल यांनी हाऊस अरेस्ट या मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेचे हाऊस अरेस्ट हे शिर्षक या तक्रारदार अभिनेत्रीने सुचवले होते. त्यामुळे या अभिनेत्रीला या शो मध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. १७ मार्च २०२५ रोजी मालाडच्या मढ येथे झालेल्या शोच्या चित्रिकरणात ती सहभागी झाली होती. मात्र शो मधील बिभत्सपणा आणि अश्लील कृत्यामुळे ती शो मधून बाहेर पडली होती.
या तक्रारदार अभिनेत्रीने दिलेल्या फिर्यादीनुसार २४ मार्च रोजी शो चा फिनॅले असल्याने या तिला मालाडच्या मढ येथे बोलावण्यात आले. त्यावेळी झालेल्या पार्टीत एझाज खान याने मला मिठी मारून ‘आय वॉन्ट यू’ असे सांगितले आणि त्याचा मोबाईल नंबर दिला. यानंतर अभिनेत्रीला संपर्क करण्यास सुरवात केली. आमच्या धर्मात ४ लग्ने होतात. मी तुझ्यासाठी लग्न करायला तयार आहे असेही त्याने सांगितले. २५ मार्च रोजी तो या अभिनेत्रीच्या मालाड येथील घरी आला. त्याने वेगवेगळ्या मालिका, वेबसिरीज आणि रिॲलिटी शोज मध्ये काम देण्याचे आश्वासन दिले आणि तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला. अभिनेत्रीवर लहान बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी त्याने स्विकारल्याचे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पुन्हा ४ एप्रिल रोजी अंधेरीच्या एसव्ही रोड येथील लोढा बेल या त्याच्या घरी तक्रारदार अभिनेत्रीला बोलावून पुन्हा तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले.
मात्र नंतर तो तिला टाळू लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अभिनेत्रीने चारकोप पोलीस ठाण्यात एझाज खान विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून चारकोप पोलिसांनी त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४, ६४ (२) ६९ आणि ७४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो फरार आहे.
हाऊस अरेस्ट या रिॲलिटी शो मध्ये अश्लील कृत्य केल्याप्रकरणी निवेदक एझाज खान आणि निर्माता दिग्दर्शकांविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सोमवारी पोलिसांनी या सर्वांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
What's Your Reaction?






