अर्नाळा आगारात पाच नवीन एसटी बसेस दाखल; आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या हस्ते लोकार्पण
जुन्या बसांच्या समस्यांना दिलासा; प्रवाशांना मिळणार सुरक्षित आणि आरामदायी सेवा

वसई, १६ जून:विरार पश्चिम येथील अर्नाळा एसटी आगारातून राज्यातील अनेक लांब पल्ल्याच्या मार्गांवर एसटी सेवा दिली जाते. मात्र, येथील बऱ्याच बसेस जुना आणि जीर्ण झाल्यामुळे प्रवाशांना सतत त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर अखेर प्रवाशांना दिलासा देणारी मोठी कामगिरी झाली असून अर्नाळा आगारात ५ नवीन एसटी बस दाखल करण्यात आल्या आहेत. रविवारी या बसांचे लोकार्पण वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्या हस्ते करण्यात आले.
या आगारातून वसई-विरार, ठाणे, भुसावळ, औरंगाबाद, पंढरपूर, कोल्हापूर, शिर्डी, विटा, सोलापूर, चोपडा, तुळजापूर या लांब पल्ल्याच्या मार्गांवर एसटी सेवा पुरविली जाते. दिवसाला सुमारे ३१० फेऱ्या या आगारातून घेतल्या जातात. मात्र, गेल्या काही वर्षांत बसांची दयनीय स्थिती, अपुरे ब्रेक्स, तांत्रिक बिघाड अशा अनेक समस्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला होता.
या स्थितीत सुधारणा करण्यासाठी एसटी महामंडळाने एकूण ३० नवीन बस अर्नाळा आगारासाठी मंजूर केल्या असून, पहिल्या टप्प्यात ५ बस दाखल करण्यात आल्या आहेत. या बस ४० आसनी असून प्रवाशांसाठी अधिक आरामदायी असणार आहेत. सुरुवातीस ६७ बस असलेल्या आगारातील बसांची संख्या आता ७२ झाली आहे.
लोकार्पण सोहळ्याप्रसंगी एसटी आगाराचे व्यवस्थापक सिद्धे सूर्यवंशी, अधिकारी रामदास मेहेर, तसेच अर्नाळा ग्रामस्थ उपस्थित होते.
सूर्यवंशी यांनी सांगितले की, "पंढरीची वारी तोंडावर आली असून या काळात पंढरपूर, विटा, चोपडा या मार्गांवर या नवीन बसेस प्राधान्याने सोडल्या जातील."
याशिवाय, गेल्या १२-१५ वर्षांपासून सेवेत असलेल्या आणि खिळखिळ्या झालेल्या २१ जुन्या कंडम बसेस येत्या तीन महिन्यांत आगारातून हटवण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली. या जुन्या बसेस मुळे प्रवाशांसोबतच चालक व वाहक यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या नवीन बसेसमुळे अर्नाळा परिसरातील प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह व वेळेवर सेवा मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. उर्वरित २५ बसेसही लवकरच आगारात दाखल होतील, यासाठी पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी दिली.
What's Your Reaction?






