आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

आतिशी मार्लेना दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

नवी दिल्ली:आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर आज, मंगळवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत आतिशी मार्लेना यांच्याकडे मुख्यमंत्र्याची जबाबदारी सोपवण्यावर एकमत झाले. आपच्या बैठकीत आतिशी यांनी एकमताने सभागृह नेतेपदी निवड करण्यात आली. अरविंद केजरीवाल यांच्या घरी नव्या मुख्यमंत्रिपदाच्या निवडीसाठी सर्व आमदारांची बैठक झाली. यात अतिशी या नव्या मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचा कार्यभार सांभाळतील असे ठरले. अरविंद केजरीवाल दुपारी 4.30 वाजता उपराज्यपाल विनय सक्सेना यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा सुपूर्द करतील. त्यानंतर नव्या मुख्यमंत्रिपदासह इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडेल.

दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून अतिशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. सुरुवातीपासून त्यांचे नाव आघाडीवर होते. अतिशी या पंजाबी राजपूत कुटुंबातून येतात आणि त्यांनी ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीतून पदवीचं शिक्षण पूर्ण केले आहे. आतिशी या डाव्या विचारसरणीने प्रेरित असून कार्ल मार्क्सचा आणि लेनीन ही दोन नावे जोडून त्यांनी आपल्या नावापुढे मार्लेना हा शब्द जोडला आहे. अतिशी 2020 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर 2023 साली त्या केजरीवाल सरकारमध्ये मंत्री झाल्या. आता वर्षभरातच त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आली. अतिशी या केजरीवाल यांच्या विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक आहेत. अण्णा हजारे यांच्या आंदोलनापासून त्या संघटनेत सक्रीय आहेत. सध्या त्यांच्याकडे सर्वाधिक मंत्रालयाचा कारभार होता. केजरीवाल जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हापासून संघटना ते सरकार सर्व पातळीवर त्यांनी मोर्चा सांभाळला. मुख्यमंत्रिपदासाठी ज्या नावांची चर्चा होती त्यात कैलाश गहलोत, गोपाल राय आणि सौरभ भारद्वाज यांच्याही नावाची चर्चा होती.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow