जनजागृतीवर भर, पण अंमलबजावणीकडे दुर्लक्ष! मिरा-भाईंदर महापालिकेचे पर्यावरणपूरक गणेशोत्सव धोरण विसंगत

जनजागृतीवर भर, पण अंमलबजावणीकडे दुर्लक्ष! मिरा-भाईंदर महापालिकेचे पर्यावरणपूरक गणेशोत्सव धोरण विसंगत

भाईंदर : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही, मिरा-भाईंदर महापालिकेच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमांची अंमलबजावणी अपुरीच राहिल्याने पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘बाप्पा माझा – शाडूचा’ या उपक्रमाच्या माध्यमातून पीओपी मूर्तींऐवजी शाडू मातीच्या मूर्तींचा प्रसार करायचा महत्त्वाकांक्षी उद्देश जाहीर करण्यात आला होता, परंतु प्रत्यक्षात काहीही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.

महापालिकेने नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यावर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यासाठी खर्चाची तरतूद देखील करण्यात आली होती. तसेच, मूर्तिकारांना शाडू माती सवलतीच्या दरात उपलब्ध करून देणे आणि विक्रेत्यांना जागा पुरवण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात या घोषणांचे पालन न झाल्याने पर्यावरण प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे.

दीड महिन्यांपूर्वी न्यायालयाने पीओपी मूर्तींवरील बंदी उठवण्याचे आदेश दिल्यानंतर महापालिकेच्या पर्यावरणपूरक मोहिमेवर परिणाम झाला आहे. परिणामी, यंदा पुन्हा पीओपी मूर्तींचा वापर वाढण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने शाडू मातीच्या मूर्तींसाठी कोणतीही ठोस मदत दिली नाही, तसेच मूर्तिकार व विक्रेत्यांसाठी वचनबद्ध सुविधा पुरवण्यात अपयश आले आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव चळवळीत सक्रिय असलेले हसमुख गेहलोत यांनी सांगितले की, “गेल्या सात वर्षांपासून आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा म्हणून प्रयत्न करत आहोत. यामध्ये महापालिकेची भूमिका महत्त्वाची असते, मात्र यंदा प्रशासनाचा पुरेसा पाठिंबा मिळत नाहीये. शाडू मातीच्या पुरवठ्याबाबत कोणतेही मूळभूत पाऊल उचलले गेलेले नाही.”

दुसरीकडे, शासकीय अधिकाऱ्यांनी जनजागृती आणि इतर कामे सुरु असल्याचा दावा केला आहे. मात्र, प्रत्यक्षात जागांवर कोठेही पर्यावरणपूरक उपक्रमांचे ठोस दर्शन घडत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow