दहिसर टोल नाका स्थलांतरित होणार ? वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी पर्याय

दहिसर टोल नाका स्थलांतरित होणार ? वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी पर्याय
मिरा भाईंदर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांनी प्रशासकीय यंत्रणेसह टोल नाक्याचा दौरा केला.

भाईंदर - दहिसर टोल नाक्यावर अवजड वाहनांच्या प्रवासामुळे  निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी टोल नाकाच जवळील मोकळ्या जागेत स्थलांतरित करण्याचा पर्याय पुढे आला आहे. यामुळे लहान वाहनांना मोकळी वाट मिळून वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लागणार असल्याचा दावा केला जात आहे.

मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या दहिसर टोल नाक्यावर प्रवाशांना वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यात 'मिरा भाईंदर मेट्रो मार्गिका -९' चे काम देखील सुरु असल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला आहे. परिणामी वर्दळीच्या वेळी वाहनांना निघण्याचा मार्ग मिळत नसून वाहतूक पूर्णतः ठप्प होत असते.

दिवसेंदिवस ही समस्या वाढत असून ही समस्या मार्गी लावण्यासाठी शुक्रवारी सकाळी मिरा भाईंदर भाजपचे आमदार नरेंद्र मेहता आणि दहिसरच्या आमदार मनिषा चौधरी यांनी प्रशासकीय यंत्रणेसह टोल नाक्याचा दौरा केला. यावेळी मुंबई पोलिस आयुक्तालयाचे वाहतूक उपायुक्त मितेश गट्टे ,मिरा भाईंदर वसई विरार पोलिस आयुक्तालयाचे वाहतूक उपायुक्त सुहास बावचे आणि टोल प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत होते.

या प्रसंगी नोक्यावर चारचाकी वाहनांना टोलमुक्ती करण्यात आली असली तरी अवजड वाहनाच्या संथ प्रवासामुळे वाहतूक कोंडी होत असल्याची बाब दिसून आली आहे.त्यामुळे यावर उपाय म्हणून मिरा रोडहुन मुंबईच्या दिशेने  जाणाऱ्या मार्गांवर टोल नाक्या शेजारीच असलेल्या मुंबई महापालिकेच्या मोकळ्या आरक्षित भूखंडावर एका बाजूचा टोलनाका स्थलांतरित करण्याचा  पर्याय पुढे आला आहे.जेणे करून अवजड वाहने एकाबाजूला झाल्यास अन्य वाहनांचा  प्रवास सुसाट करण्यास मदत होईल. तसेच मुंबईहुन मिरा रोडच्या दिशेने प्रवास करत असताना पेणकरपाडा जवळ सिंग्नल लागल्यास वाहनचालकांना मोठी प्रतीक्षा करावी लागते. परिणामी काही क्षणातच  वाहनाच्या लांबच लांब रांगा उभ्या राहतात. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी येथील सिंग्नल यंत्रणा बंद करून वाहनांना पुढील चौकातून वाट करून देण्याचा पर्याय काढण्यात आला आहे. वरील दोन्ही निर्णयाची वाहतूक पोलिसांकडून शहानिशा केल्यानंतर सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर दहा दिवस हा प्रयोग राबवला जाईल, अशी माहिती आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow