मालमत्ता करापोटीची 563.20 कोटींची थकबाकी!वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनास्था नडली

विरार : वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रचंड अनास्थेमुळे सन 2023-24 या वर्षात मालमत्ता करापोटीची 563.20 कोटींची थकबाकी वसई-विरार महापालिकेला वसूल करता आलेली नाही. गतवर्षीच्या मालमत्ता कर वसुलीच्या तुलनेत चालू वित्तीय वर्षात मालमत्ता कर वसुली किमान 10 टक्के अतिरिक्त असणे आवश्यक आहे; मात्र महापालिकेची ही टक्केवारी वजा 7.23 टक्के इतकी असल्याचे समोर आले आहे. या अनास्थेचा परिणाम म्हणून वसई-विरार महापालिकेला केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या अनुदानावर पाणी सोडावे लागणार आहे.
मालमत्ता कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. मालमत्ता प्राप्त करातून महापालिका हद्दीतील नागरिकांना प्राथमिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. याशिवाय; विविध विकासकामांवरही या करातून खर्च करण्यात येतो. वसई-विरार शहर महानगरपालिका हद्दीतील वाढती लोकसंख्या व वाढत्या लोकसंख्येला लागणाऱ्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जास्तीत जास्त मालमत्ता कर वसूल होणे अपेक्षित आहे. केंद्र व राज्य शासनाच्या प्राप्त निर्देशांनुसार, मागील वर्षीच्या तुलनेत चालू वित्तीय वर्षात मालमत्ता कर वसुली किमान 10 टक्के अतिरिक्त असणे आवश्यक आहे.
वसई-विरार महापालिका हद्दीत आजमितीस 8,31,205 निवासी व 1,54,680 वाणिज्य मालमत्ता अशा एकूण 9,85,885 मालमत्तांची महापालिका दफ्तरी नोंद आहे. मालमत्ता कर विभागात प्रभाग समितीसहित 140-150 कर्मचारी मालमत्ता कर वसुलीसाठी कार्यरत आहेत. सदर कर्मचाऱ्यांमार्फत मालमत्ता कराची कार्यवाही प्रभाग समिती स्तरावर सुरू आहे. मात्र त्यानंतरही वसई-विरार महापालिकेला थकित मालमत्ता कर वसूल करण्यात यश आलेले नाही. किंबहुना 2022-23 च्या तुलनेत सन 2023-24 या वर्षात 7.23 टक्क्यांनी मालमत्ता कर वसुलीत घट झालेली आहे. विशेष म्हणजे; थकित रकमेचा हा आलेख प्रचंड चढता आहे.
थकित मालमत्ता कर वसूल करण्याच्या अनुषंगाने ठेकेदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय वसई-विरार महापालिकेने घेतला आहे. नियुक्त ठेकेदार यांच्याकडून वसूल होणाऱ्या थकित रकमेपैकी ठरविण्यात येणाऱ्या टक्केवारीच्या प्रमाणात देयक ठेकेदारास अदा करण्याचा निर्णयही महापालिकेने घेतलेला आहे. सदर रक्कम मालमत्ता धारकांकडून वसूल करण्यासाठी बाह्य यंत्रणा पुरवठादाराला (एजन्सी) अंदाजे 2 टक्के द्यायचे झाल्यास त्याकरता एकूण 5.7 कोटी इतका अंदाजित खर्च महापालिकेने अपेक्षित धरला आहे. हा खर्च ‘मालमत्ता जप्त मालमत्ता प्रसिद्धी खर्च`मधून करण्यात येणार आहे.
मालमत्ता कर विभागात प्रभाग समितीसहित 140-150 कर्मचारी मालमत्ता कर वसुलीसाठी कार्यरत आहेत. मात्र 563.20 कोटींची थकबाकीस या कर्मचाऱ्यांच्या अनास्थेसह त्या-त्या विभागातील ‘लागेबांधे` कारणीभूत ठरले आहेत. अनेक कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या अनेक वर्षांत बदली झालेल्या नाहीत. याचे परिणाम म्हणून त्या-त्या भागातील मालमत्ताधारकांसोबत त्यांचे ‘आर्थिक संबंध` दृढ झालेले आहेत. अनेक वरिष्ठ अधिकारी कर वसुलीसाठी योगदान देत नाहीत. किंबहुना आपली जबाबदारी झटकताना दिसून आलेले आहेत. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रभागनिहाय ‘सरप्राईज व्हीजिट` करणे, कर वसुलीचा व कर्मचाऱ्यांच्या हालचाल नोंदवहीचा, त्यांच्या रोजनिशीचा आढावा घेणे, दैनंदिन उद्दिष्ट व साप्ताहिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या उद्देशाने प्रभाग समिती स्तरावर करण्यात आलेले नियोजन तपासणे व नियोजित उद्दिष्ट न गाठल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे, त्यांच्या पगारात कपात करणे अपेक्षित असते. मात्र या सगळ्याचा अभाव असल्याने कर थकबाकीचा आलेख वाढत आहे. विशेष म्हणजे; महापालिकेचा कर वसुलीचा भर नवीन मालमत्ता व मालमत्ता हस्तांतरण यावरच राहिलेला आहे. थकित कर वसुलीसाठी कोणत्याही नव्या उपाययोजना अवलंबल्या जात नसल्याने व त्यासाठी धाडस करत नसल्याने कराची प्रचंड थकबाकी आहे. अनेक मालमत्ता आजही निर्लेखित करण्यात आलेल्या नाहीत, असे निरीक्षण पालिकेतील एका अधिकाऱ्याने नोंदवले आहे. त्यामुळे कर वसुलीसाठी बाह्य यंत्रणेची नियुक्ती झाल्यास 50 कर्मचाऱ्यांवर घरी बसण्याची वेळ येणार आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांचा आळशीपणा व लागेबांधे कारणीभूत असणार आहेत, असे या अधिकाऱ्याचे म्हणणे आहे.
मालमत्ता कर वसुलीचा मागील पाच वर्षांचा अहवाल खालीलप्रमाणे!
आर्थिक वर्ष 2019-20 एकूण मालमत्तांची संख्या 8,12,179, कराची मागणी 319.35 कोटी, वसुली 195.32, थकबाकी 196.02, टक्केवारी 0 टक्के
अर्थिक वर्ष 2020-21 एकूण मालमत्तांची संख्या 8,66,793, कराची मागणी 471.35, वसुली 211.25, थकबाकी 262.98, टक्केवारी 13 टक्के
आर्थिक वर्ष 2021-22, एकूण मालमत्तांची संख्या 8,80,349, कराची मागणी 608.52, वसुली 321.02, थकबाकी 308.62, टक्केवारी 45 टक्के
आर्थिक वर्ष 2022-23 एकूण मालमत्तांची संख्या 9,36,611, कराची मागणी 835.24, वसुली 372.83, थकबाकी 474.32, टक्केवारी 16 टक्के
आर्थिक वर्ष 2023-24, एकूण मालमत्तांची संख्या 9,42,610, कराची मागणी 908.59, वसुली 345.89, थकबाकी 563.20, टक्केवारी -7.23 टक्के.
What's Your Reaction?






