वसई, २६ जून: वसई-विरार परिसरातील विविध धबधबे, समुद्र किनारे व नद्यांच्या काठावर पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांना रोखण्यासाठी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी पर्यटनस्थळांवर बंदी लागू केली आहे. नागरी सुरक्षा संहिता २०२३ अंतर्गत ही बंदी २५ जून ते ८ जुलै दरम्यान लागू राहणार आहे.

ही बंदी नायगाव, वसई आणि वालीव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पर्यटनस्थळांवर लागू आहे. बंदीच्या अधीन असलेल्या प्रमुख ठिकाणांमध्ये सुची, रानगाव, भुईगाव, बेनापट्टी, ब्राण पाडा हे समुद्रकिनारे तसेच देवकुंडी कामण, चिंचोटी धबधबा आणि राजावळी खदान यांचा समावेश आहे.

दरवर्षी पावसाळा सुरू होताच मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी गर्दी करतात, परंतु काही पर्यटकांच्या बेफिकिरीमुळे बुडणे, वाहून जाणे, अपघात होणे अशा गंभीर घटना घडत असतात. उंचावरून उड्या मारणे, प्रवाहात सेल्फी काढणे, निसरड्या पायवाटांवरून जाणे यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता वाढते.

पोलीस उपायुक्तांनी स्पष्ट केले की, बंदीच्या काळात या ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र जमू शकत नाहीत. तसेच वाहत्या पाण्यात पोहणे, फोटो-व्हिडिओ शूटिंग करणे, मद्यपान किंवा त्याचा वाहतूक व विक्री करणे यावरही पूर्णतः बंदी आहे. प्रतिबंधित परिसरात १०० मीटरचा परिघ निश्चित करण्यात आला आहे.

पोलीसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. मागील वर्षी चिंचोटी धबधब्यावर याच उपाययोजनांमुळे एकही दुर्घटना घडली नव्हती, अशी माहिती नायगाव पोलिसांनी दिली.

पर्यटकांनी सुरक्षिततेची पूर्ण काळजी घ्यावी आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.a