वसई, २६ मे: वसई-विरार महापालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत महिलांना सार्वजनिक बस प्रवासात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे. येत्या १ जून २०२५ पासून हा निर्णय अंमलात येणार असून, दररोज बसने प्रवास करणाऱ्या नोकरदार, गृहिणी आणि विद्यार्थिनींना याचा थेट लाभ मिळणार आहे.

महापालिकेच्या परिवहन विभागाकडे सध्या १४७ बसेस असून, त्या ३६ मार्गांवर सेवा देतात. दररोज या बसेसद्वारे ७५ ते ८० हजार प्रवासी प्रवास करतात, ज्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. महिलांच्या वतीने प्रवासात सवलतीची मागणी सातत्याने होत होती. त्याची दखल घेत वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता.

महापालिका आयुक्त अनिकुमार पवार यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून निर्णय घेतला असून, राज्यातील एसटी महामंडळाच्या ५०% सवलतीच्या धर्तीवर ही योजना राबवली जाणार आहे.

या निर्णयामुळे महिलांच्या रोजच्या प्रवासाचा आर्थिक बोजा कमी होणार असून, विशेषतः कामगार महिला, विद्यार्थीनी, गृहिणी आणि दररोज प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

परिवहन विभागाकडून याआधीही ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, कर्करोग व डायलिसिस रुग्णांची मुले, अनाथ इत्यादींसाठी सवलतीच्या योजना राबवण्यात आल्या आहेत. या नव्या सवलतीमुळे महिलांचाही समावेश अधिक व्यापक स्वरूपात होणार आहे.

महापालिकेच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून, सामाजिक समावेश व महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल म्हणून याकडे पाहिले जात आहे.