वसई विरार महानगरपालिकेच्या किनारा स्वच्छता मोहीमेचा जागतिक विक्रम:१३ हजार जणांचा सहभाग, तर ५१ टन कचरा संकलित
विरार : जागतिक सागरी किनारा स्वच्छता दिनाचे औचित्य साधून शनिवार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे किनारपट्टी स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, अग्निशमन जवान, सामाजिक संस्थांचे स्वंयसेवक, बचत गटाच्या महिला, पर्यावरणप्रेमी आणि नागरिक मिळून १३ हजारांहून अधिक जण सहभागी झाले होते. या मोहीमेत एकूण ५१ टन कचरा संकलित करण्यात आला आहे. या मोहिमेची जागतिक विक्रमात नोंद करण्यात आली आहे. २१ सप्टेंबर हा जागतिक किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसानिमित्त वसई-विरार महाापालिकेने राजोडी ते कळंब या अडीच किलोमीटरच्या पट्ट्यात स्वच्छता मोहीम आयोजित केली होती. या मोहिमेसाठी वसई विरार शहराचे प्रथम महापौर राजीव पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी समुद्रकिनार्यावरील कचरा उचलून स्वच्छता मोहिमेस आरंभ केला. या मोहिमेत ४७ शाळांचे विद्यार्थी, १९ महाविद्यालयांचे विद्यार्थी, ३ सेवाभावी संस्थांचे स्वयंसेवक आणि नागरिक मिळून तब्बल १३ हजारांहून व्यक्ती यात सामील होऊन, एकत्र येऊन सफाई केली. एवढया मोठ्या संख्येने नागरिकांनी एकत्र येऊन समुद्रकिनारा स्वच्छ करण्याची मोहीम राबविल्याने विक्रम प्रस्थापित झाला आहे. या विक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदविण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धन हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. मात्र हे काम केवळ एक दिवस करून चालणार नाही, ते नियमित व्हावे म्हणूनच ही सागर किनारा स्वच्छता मोहीम पुढेही सुरू राहाणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी यावेळी सांगितले. या मोहिमेत सामील झालेल्या व्यक्तींचे गट विभागण्यात आले होते आणि या गटांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. शालेय गटात यू. एस ओस्वार प्रथम क्रमांकाचे विजेते ठऱले. तर राजीव गांधी विद्यालय दुसऱ्या आणि भावधारा अकादमी तिसर्या क्रमांकाचे विजेते ठरले. महाविद्यालयीन गटात रामनारायण महाविद्यालय (प्रथम), न्यू विवा महाविद्यालय (द्वितीय) आणि अण्णासाहेब वर्तक महाविद्याल (तृतीय) हे विजेते ठरले.
प्लास्टीकचा पुर्नवापर
या मोहीमेदरम्यान ‘गो शून्य या संस्थेमार्फत प्लास्टिक पुनर्वापाराचे प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. या मोहिमेदरम्यान संकलित झालेला ५१ टन कचऱ्यापैकी ६५० किलो टाकाऊ प्लास्टीकपासून त्याच जागी लाईव्ह रिसायकलिंग करण्यात आले. प्रथम संकलित केलेल्या प्लास्टिकचा चुरा करण्यात आला आणि हा चुरा यंत्रात टाकून विविध साच्यांचा वापर करून कुंडी, किचेन, कानातले, ग्लास, कप आदी वस्तू बनविण्यात आल्या. याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले.
मोहिमेसाठी महापालिकेचे नियोजन
वसई-विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मार्गर्शनाखाली महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या नियोजनामुळे ही मोहीम यशस्वी झाली. १३ हजारांहून अधिक नागरिक एकत्र येऊनही कुठल्याही प्रकारची गैरसोय झाली नाही. या मोहिमेत सहभाही झालेल्यांसाठी महापालिकेने येण्या-जाण्यासाठी परिवहनच्या बसची सुविधा, पाणी, नाश्ता, हातमोजे, टोपी, मास्क आदींची सुविधा जागोजागी केली होती. तसेच फिरत्या शौचालयाची व्यवस्था केली होती. यासह डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुग्णवाहिका आदी आपत्कालिनस्थिती हाताळण्यासाठी उपस्थित होते. यामुळे स्वच्छता मोहिम सुरळीतपणे पार पडली. यावेळी अतिरिक्त आयु्क्त संजय हेरवाडे तसेच उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अभियंते, वैद्यकीय अधिकारी आणि महापालिकेचे इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
वसई-विरार शहराला लाभलेल्या अथांग, निसर्गरम्य किनाऱ्याचे संवर्धन होणे, सागरी परिसंस्थेचे संवर्धन होणे आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक कर्तव्याची जाणीव निर्माण व्हावी या उद्दीष्टाने ही मोहीम राबविण्यात आली आहे. जन सहभाग मिळाल्यावर अशा मोहिमा यशस्वी होतात.- नानासाहेब कामठे, उपायुक्त (घनकचरा), वसई विरार शहर महानगरपालिका
What's Your Reaction?






