वसई विरार महापालिकेचा १ लाख झाडे लावण्याचा संकल्प कागदावरच ?

पालिकेने जागतिक पर्यावरण दिनाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते ते सध्या तरी केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. 

वसई विरार महापालिकेचा १ लाख झाडे लावण्याचा संकल्प कागदावरच ?

विरार : वसई -विरार पालिकेने शहरात 5 जून रोजी शहराच्या रस्त्याच्या कडेला झाडे लावून जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा केला होता. यंदाच्या पावसाळ्यात महानगरपालिकेने शहरात एक लाख झाडांचे वृक्षारोपण करण्याचा मानस ठेवला होता. मात्र पावसाळा संपून काही महिने लोटले तरीदेखील महानगरपालिकेने वृक्षारोपण करण्याच्या कामाला सुरुवात केली नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे पालिकेने जागतिक पर्यावरण दिनाला वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते ते सध्या तरी केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे. 

वसई- विरार शहरात लागवड केल्या जाणार्‍या झाडांमध्ये बांबू, आंबा, वड, पिंपळ, काजू, खैर, गुलमोहर, कडुलिंब, जांभूळ, बकुल , चिंच, आपटा, ऐन अशा विविध प्रकारच्या वृक्षाच्या प्रजातीचा समावेश असणार होता. शहराच्या हरित पट्ट्यात वाढ व्हावी या हेतूने महापालिकेने शहरात कृत्रिम जंगल उभारण्याचा एक भाग म्हणून वृक्ष लागवड केली जाणार होती. मात्र पावसाळा संपून महिने होऊन गेले तरीही पालिकेने झाले लावण्याच्या मोहिमेला गती दिलेली नाही. त्यामुळे पालिकेने केलेला संकल्प हा कागदावरच राहिल्याचे चित्र आहे. शहरातील ८८ स्मशानभूमींपैकी ५४ स्मशानभूमीत पालिकेच्या वतीने वृक्ष लागवड केली जाणार होती. तर झाडांचा डीपीआर ( डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ) तसेच जिओ टॅगिंग केले जाणार होते. त्यामुळे किती झाडे आहेत याचा तपशील पालिकेकडे राहणार होता. 

शहरात कृत्रिम जंगल उभारण्यासाठी वसई- विरार पालिकेने कृत्रिम जंगल योजनेअंतर्गत एकूण ५ टप्पे तयार केले होते. त्यामध्ये केवळ ३ टप्पे पूर्ण केले. २०१७ पासून शहरात कृत्रिम जंगल विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली होती. यामध्ये विरारमधील शिरगाव, गास, कोपरी नारिगी, चंदनसार, कण्हेर, विरार, नालासोपारा येथील बिलालपाडा, धानीव, पेल्हार या ठिकाणी कृत्रिम जंगल तयार करून त्या ठिकाणी पर्यटनस्थळ, जंगल पर्यटन, पक्षी अधिवास, हरीण अभयारण्य, औषधी वनस्पती उद्याने विकसित करण्यात येणार होती. मात्र या योजनेवर सध्या कोणतेही काम होताना दिसत नाही. महापालिकेने २०१७ ते २०२० या तीन वर्षांत शिरगाव, नारंगी, खार्डी कोशिंबे, धानिव अशा विविध ठिकाणच्या भागांतील २७९ हेक्टर क्षेत्रात ३ लाख ९ हजार ३७५ इतक्या वृक्षांची लागवड केली होती. त्यातील २ लाख ६८ हजार ४२४ इतके वृक्ष सुस्थितीत आहेत.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow