वसई-विरार व मिरा-भाईंदर परिसरात अमली पदार्थांचा वाढता विळखा

विदेशी नागरिकांचा सहभाग, नालासोपारा बनले ‘हॉटस्पॉट’; पोलिसांच्या कारवायांनंतरही वाढती तस्करी चिंतेचा विषय

वसई-विरार व मिरा-भाईंदर परिसरात अमली पदार्थांचा वाढता विळखा

हरबात, २७ मे – वसई-विरार आणि मिरा-भाईंदर परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून, हा भाग हळूहळू अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालला आहे. मागील काही महिन्यांपासून अनेक मोठ्या प्रमाणातील जप्तीच्या घटना उघडकीस येत असून, नालासोपारा आणि त्यासभोवतालचा परिसर तस्करीसाठी केंद्रबिंदू ठरत आहे.

गेल्या सहा दिवसांत सुमारे १० कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची जप्ती करण्यात आली असून, नालासोपाऱ्यातील गतीनगर भागातील एका घरातच एमडी (मेफेड्रोन) सारख्या घातक अमली पदार्थाचा कारखाना उभारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात एक नायजेरियन महिला आणि तिचा साथीदार अटकेत घेतले गेले आहेत.

शहरीकरणाचा अतिरेक आणि अनधिकृत वस्तीचा वाढता प्रभाव
मुंबईतील वाढत्या घरांच्या किमतीमुळे वसई-विरार आणि मिरा-भाईंदर परिसरात स्थलांतर वाढले असून, अनेक भागांमध्ये अनधिकृत झोपड्या आणि इमारती उभ्या राहत आहेत. याच ठिकाणी काही परदेशी नागरिक आणि गुन्हेगारी वृत्तीची मंडळी आसरा घेत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

नायजेरियन नागरिकांचा वाढता सहभाग
विशेषतः नालासोपारा, वसई आणि मीरारोड परिसरात नायजेरियन नागरिकांची वस्ती वाढत असून, गेल्या अनेक अमली पदार्थांच्या कारवायांमध्ये हेच नागरिक मुख्य आरोपी म्हणून सापडले आहेत. पोलिसांच्या तपासात याचा स्पष्ट उल्लेख असून, गेल्या दोन वर्षांत १५०० पेक्षा अधिक कारवाया अमली पदार्थ विरोधी पथकाने केल्या आहेत.

अमली पदार्थांचे हॉटस्पॉट ठिकाणे
तुळिंज, संतोष भुवन, गतीनगर, अकापुरी, आचोळे, डोंगडोंगरी, शिर्डीनगर, बिलापाडा, मोरे गाव तलाव परिसर, अगरवा नगर या ठिकाणी अमली पदार्थांची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे समोर आले आहे.

पोलीस यंत्रणांवरही प्रश्नचिन्ह
मध्यंतरी काही कारवायांमध्ये पोलीस यंत्रणेचा छुपा सहभाग असल्याच्या तक्रारी आल्या होत्या, ज्यामुळे कारवाईचे परिणाम अद्याप प्रभावीपणे दिसून आलेले नाहीत. पोलिसांच्या छुप्या पाठिंब्याची शंका गंभीर असून, त्यावर तात्काळ कारवाई होणे आवश्यक आहे.

‘झिरो टॉलरन्स’ मोहीम राबवण्याची गरज
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमली पदार्थ विरोधात 'झिरो टॉलरन्स' धोरण जाहीर केले असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेला निर्देश दिले आहेत. वसई-विरार व मिरा-भाईंदर परिसरात देखील या मोहिमेची तात्काळ अंमलबजावणी होणे अत्यावश्यक ठरते.

तरुणाई धोक्यात
अमली पदार्थांचे सहज उपलब्धतेमुळे तरुण पिढी विशेषतः महाविद्यालयीन विद्यार्थी या विळख्यात अडकत चालले आहेत. त्यामुळे या समस्येवर केवळ कारवाई नव्हे तर साक्षरता आणि जनजागृती मोहिमा राबवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow