वसई विरार शहर महानगरपालिकेच्या दर सोमवारी होणाऱ्या आढावा बैठकांमुळे सामान्य नागरिकांची गैरसोय

विरार - वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांनी मागील दोन वर्षाच्या कालावधीपासून पालिका मुख्यालयामध्ये दर सोमवारी आढावा बैठकीचे आयोजन केले जाते. या आढावा बैठकीमुळे उपायुक्त, अभियंते, नऊ प्रभागांमधील सहाय्यक आयुक्त त्यांचे संबंधित अधिकारी असा सगळा लवाजमा या बैठकांना उपस्थित असतो. या आढावा बैठका करदात्या नागरिकांनाच अडचण ठरत आहेत.
मागील महिन्यात विधानसभा निवडणूक, त्यानंतर ४१ इमारतीची निष्कासनाची कारवाई यामुळे आधीच कामकाज ठप्प होते. पाच दिवसांचा आठवडा झाल्याने शनिवार, रविवार सुट्टी असते. त्यात आणखी सोमवार व्यस्त दिवसांत आल्याने अधिकारी दिवसभर नसल्यामुळे अर्धे अधिक कामकाज ठप्प होते. विविध कामांसाठी येणारे नागरिक हतबल होऊन माघारी फिरतात. सोमवारच्या आढावा बैठकींमुळे फक्त चारच दिवस प्रभागांमध्ये प्रशासकीय कामकाज केले जाते. प्रभागांमधील उपलब्ध कर्मचारी अधिकारी नसल्याची कारणे देतात. उर्वरित दिवशी न्यायालयाच्या तारखा, सुनावण्या ,सर्वेक्षण, व अन्य कामांमुळे बहुतांश अधिकारी भेटण्यासाठी करदात्या नागरिकांना साकडं घालावं लागतं.
विशेष म्हणजे सदर आढावा बैठकीना दोन वर्षा पेक्षा जास्त अवधी झाला आहे त्यातून सर्वसामान्य नागरिकांकरता नेमकं काय निष्पन्न झालं आहे ? याचा खुलासा आजतायगत आयुक्त अनिल कुमार पवार यांनी केलेला नाही. त्यामुळे सदर आढावा बैठका व त्यांचा तपशील जनतेसमोर उघड करणे आवश्यक आहे. दोन अतिरिक्त आयुक्त, अकरा उपायुक्त व अन्य अधिकारी असा मोठा जत्था आयुक्तांनी नियुक्त केलेला आहे. ज्या समस्या काही वर्षांपूर्वी होत्या त्या समस्यांना आजही येथील नागरिक तोंड देत आहेत. उलट पक्षी सदरच्या समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याचे चित्र शहरात दिसून येते. तसेच यात इतरही समस्यांची भर पडत आहे.
सोमवारच्या बैठका ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाऊ शकतात. यामुळे वेळ, इंधन, श्रम वाचले जाऊन. नागरिकांना ही आपल्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडता येतील अशी प्रतिक्रिया आता सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
What's Your Reaction?






