वाचनसंस्कृतीला चालना हवी : पाळघर जिल्ह्यात शासनमान्य वाचनालयांची टंचाई

पाळघर : वाचनसंस्कृती वृद्धिंगत करण्याचा शासनाचा प्रयत्न असूनही पाळघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाचनालयांची दयनीय स्थिती पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये एकूण ३६ शासनमान्य वाचनालये कार्यरत आहेत, यातील तब्बल २६ वसई-विरार महानगरपालिका हद्दीत आहेत, तर उर्वरित संपूर्ण ग्रामीण जिल्ह्यासाठी केवळ १० वाचनालये उपलब्ध आहेत.
ग्रामीण विद्यार्थ्यांना वाचनसंपदेसाठी संघर्ष करावा लागत आहे. विशेषतः डहाणू, तलासरी, वाडा यांसारख्या तालुक्यांमध्ये शासकीय वाचनालयांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. पाळघर नगरपरिषद हद्दीतही सध्या एकही कार्यरत सार्वजनिक वाचनालय नाही, ही बाब चिंतेची आहे.
शासनाकडून ग्रामपंचायतींना ५० हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत निधी वाचनालयासाठी मंजूर केला जातो. परंतु अनेक ग्रामपंचायती वाचनालयाऐवजी हा निधी इतर कामांमध्ये खर्च करत असल्याचे दिसून येते. तथापि, केळवे, माहीम, सफाळे, माकुणसार, जव्हार, वाडा यांसारख्या गावांतील काही ग्रामपंचायतींनी सकारात्मक उदाहरण प्रस्थापित करत वाचनालये उभारून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सोय उपलब्ध करून दिली आहे.
पाळघर नगरपरिषदेचे वाचनालय मात्र धूळखात पडले आहे. पूर्वी टेंभोडे येथे असलेले वाचनालय आता बीएसएनएल इमारतीत स्थलांतरित झाले आहे. इमारत अतिधोकादायक घोषित करण्यात आली असून वाचनालयात पुरेशा सोयी-सुविधा, ग्रंथसंपदा आणि वाचकांचा अभाव आहे. ३० लाखांचा ई-वाचनालय निधी अर्थसंकल्पात मंजूर असतानाही त्याचा ठोस उपयोग झाल्याचे दिसून आलेले नाही.
दरम्यान, पाळघर जिल्हाधिकारी कार्यालयातील वाचनालय मात्र विद्यार्थ्यांना आधार देणारे ठरत आहे. येथे दररोज ४०-५० विद्यार्थी अभ्यासासाठी येतात, सुमारे ६०,००० पुस्तके आणि ३५० सभासदांची नोंदणी आहे. मासिक ५० रुपये शुल्क आकारले जात असून अनेक विद्यार्थी पुस्तके घरी नेऊन वाचनाचा लाभ घेत आहेत.
What's Your Reaction?






