वीज खंडिततेमुळे वसईतील उद्योगांना फटका; कारखाने बंद ठेवण्याची वेळ, उद्योजक संतप्त

वसई, ११ जून: वसई पूर्वेतील चिंचोटी ते पोमण परिसरात सातत्याने होणाऱ्या वीज खंडिततेमुळे स्थानिक उद्योगपती आणि उद्योजक चिंतेत असून, अनेकांना आपल्या कारखान्यांचे उत्पादन थांबवण्याची वेळ आली आहे. या समस्येमुळे उद्योजक आणि हजारो कामगारांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या भागात मागील काही वर्षांत 300 ते 400 लघुउद्योग आणि कारखाने उभे राहिले आहेत. सुमारे 50,000 नागरिकांना या उद्योगांमधून रोजगार मिळत आहे. मात्र, अलीकडील काही दिवसांत सातत्याने वीज पुरवठा बंद होत असल्यामुळे कामकाजात मोठा अडथळा येत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून दररोज अनेक तास वीज गायब होत आहे. परिणामी, नित्य नेमाने सुरू असणारे उत्पादन थांबते, कामगार काम न करता बसून राहतात आणि उद्योजकांना दुहेरी आर्थिक फटका बसतो. “आम्ही वेळेत उत्पादन करू शकत नाही. वीज नसेल तर उद्योग कसे चालवायचे?” असा सवाल उद्योजकांनी उपस्थित केला आहे.
सोमवारी महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय खंडारे यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजक व महावितरण अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी उद्योजकांनी महावितरणवर वीज समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. महावितरणने तातडीने वीज वितरण यंत्रणा सुधारण्याची मागणी करण्यात आली.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “तांत्रिक अडचणी आणि वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे खंडिततेचे प्रमाण वाढले आहे. चिंचोटी ते पोमण या झपाट्याने विकसित होत असलेल्या भागासाठी १५ मीटर उंचीचे ११० मोनोपोल उभारण्याची योजना आहे. त्यापैकी ३५ पोल उभारले गेले आहेत, उर्वरित काम सुरू आहे.”
वसई-विरार परिसरात झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे वीजेची मागणी प्रचंड वाढली आहे. औद्योगिक क्षेत्रासाठी ७० टक्के वीज वापरली जाते. महावितरणने या भागासाठी पोमण येथे २२०/२२ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र मंजूर केले आहे. मात्र, अजूनही कामाला गती न मिळाल्याने हे उपकेंद्र रखडले आहे, हे स्पष्ट झाले आहे.
सामाजिक कार्यकर्ते जयेंद्र भोर यांनी सांगितले की, “उद्योग टिकण्यासाठी आणि रोजगार सुरक्षित राहण्यासाठी वीज पुरवठा सुरळीत असणे आवश्यक आहे. सरकार आणि महावितरणने ही गंभीर समस्या तातडीने सोडवावी.”
What's Your Reaction?






