भाईंदर:आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय यंदा एसटी महामंडळाने केली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने भाईंदरहून विशेष वारी बस सेवा सुरू करण्यात आली होती. या सेवेला भाविकांनी उदंड प्रतिसाद दिला असून, ३ जुलै ते १० जुलै या कालावधीत हजारो भाविकांनी भाईंदरहून पंढरपूरकडे प्रवास केला.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत एसटी महामंडळाने राज्यभरातून एकूण ५,२०० विशेष बसेस सोडल्या. या बसेसनी २१,४९९ फेऱ्या करत एकूण ९,७१,६८३ भाविक प्रवाशांची सुरक्षित ने-आण केली. यामुळे एसटी महामंडळाला ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, हे उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ६ कोटी ९६ लाख रुपयांनी अधिक आहे.

वारीच्या काळात पंढरपूर येथे तैनात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना जेवणाची व नाश्त्याची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रताप सरनाईक यांनी स्वतःच्या खर्चातून मोफत जेवण, चहा आणि नाश्त्याची व्यवस्था केली. त्यांच्या या उपक्रमामुळे कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे.

भाविकांच्या सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी केलेल्या या व्यापक व्यवस्थेबद्दल एसटी महामंडळ आणि मंत्री सरनाईक यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.