लाडकी बहिण योजनेच्या प्रक्रियेसाठी तुफान गर्दी: नालासोपार्याच्या बॅंक ऑफ बडोदा शाखेची दमछाक
प्रीती खुमान ठाकूर
मुंबई : राज्य शासनाने लागू केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या अर्जांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महिलांनी नालासोपार्याच्या बॅंक ऑफ बडोदाच्या गाला नगर शाखेत गर्दी केली आहे. शेकडोंच्या संख्येने महिला एकत्र येत असल्याने त्यांचे नियोजन करण्यात बॅंक व्यवस्थापनाची तारांबळ उडत आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी बॅंकेने केली आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी महिलांना आधार कार्ड लिंक करणे (सिंडींग) तसेच खाते केवायसी करणे अनिवार्य आहे. यासाठी राष्ट्रीयकृत बॅंकेत खाते असणे आवश्यक आहे. नालासोपारा पूर्वेला असलेल्या गाला नगर मध्ये बॅंक ऑफ बडोद्याची शाखा आहे. या परिसरात उत्तर भारतीय महिला मोठ्या संख्येने राहतात. त्यातील बहुतांश महिला श्रमिका आणि दारिद्रय रेषेखालील आहे. ११ वर्षांपूर्वी बॅंक सुरू झाली तेव्हा हजारो महिलांनी शून्य रक्कम (एफआय) खाते उघडले होते. त्यातील अनेक खाती आता बंद आहेत. या योजनेसाठी खाते पुन्हा सुरू करणे, आधार लिंक करणे आदी प्रक्रिया या महिलांना करावी लागत आहे. त्यासाठी एका महिला ग्राहकाला १० ते १५ मिनिटांचा वेळ लागत असल्याने प्रचंड गर्दी होत आहे.
बॅंक ऑफ बडोदा मध्ये सुमारे ३० हजार खातेदार आहेत. त्यातील महिलांची संख्या अधिक आहे. त्यामुळे या योजनेची बॅंकेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रचंड गर्दी होत असल्याचे बॅंकेचे व्यवस्थापक अनिल चव्हाण यांनी सांगितले. आमच्या बॅंकेची शाखा लहान आहे. जेमतेम ३० ते ४० माणसं एकाच वेळी राहू शकतात. पंरतु मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्याने काम करणे अवधड झाले आहे. बॅंकेत दररोज ८ ते ९ जणांचा स्टाफ असतो. प्रत्येकाला १५ मिनिटांचा वेळ द्यावा लागत असल्याने बॅंक कर्मचार्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे आता आम्ही रांगा लावून १० लोकांना आत सोडत आहोत. वेळे पेक्षा अधिक काम आम्हाला करावे लागत आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. आता पर्यंत आम्ही १० हजार खातेदार महिलांची बॅंक खाते अद्यायावत केली आहे. अद्यापही २ हजारांहून अधिक खात्यांचे काम बाकी आहे.
गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांना यापूर्वीच बॅंकेने पत्र दिले आहे. मात्र पोलीस केवळ फेरी मारून जातात. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पोलीस बंदोबस्त देण्यात यावा अशी मागणी बॅंकेने केली आहे. गर्दी प्रमाणापेक्षा जास्त वाढली तर अप्रिय घटना घडण्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
What's Your Reaction?






