२८७ वा वसई विजयोत्सव दिन’ उत्साहात साजरा; मशाल यात्रेने वसई किल्ल्यापर्यंत इतिहासाची साक्ष
वसई, १२ मे २०२५ :वसई विरार शहर महानगरपालिका क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘२८७ वा वसई विजयोत्सव दिन’ सोमवार, दि. १२ मे २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात आणि ऐतिहासिक थाटात साजरा करण्यात आला.
प्रथेप्रमाणे सकाळी ७.०० वाजता वज्रेश्वरी देवी मंदिर, वज्रेश्वरी येथे मशाल पूजन करून विजयोत्सवाची मशाल यात्रा आरंभ करण्यात आली. विशेष अग्निशमन वाहन व बाईकस्वारांच्या सोबत ही यात्रा वज्रेश्वरीहून वसईकडे मार्गस्थ झाली.
मशाल यात्रा राष्ट्रीय महामार्ग – वसई फाटा – वालीव नाका – गोखीवरे नाका – चिमाजी अप्पा उद्यान, नवघर – माणिकपूर – पारनाका मार्गे ढोल-ताशा, लेझीम पथकांच्या गजरात वसई किल्ल्यावर पोहोचली. यामध्ये विविध पारंपरिक वेशभूषेत नागरिक, विद्यार्थी, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
नरवीर चिमाजी अप्पा स्मारक, वसई किल्ला येथे मशाल यात्रेचा समारोप झाला. यानंतर मान्यवरांच्या हस्ते चिमाजी अप्पा यांच्या अश्वारूढ पुतळ्याला व गौतम बुद्धांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. उपस्थितांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिक व जवानांना श्रद्धांजली वाहिली.
यानंतर कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार, राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. पावसामुळे परिसर चिखलमय झाल्याने यंदाचे विजयोत्सवाचे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले व तीन दिवसांचा कार्यक्रम एकदिवसीय करण्यात आला. तरीही हा कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमास मा. आमदार श्रीमती स्नेहा दुबे-पंडित, मा. आमदार श्री. राजन नाईक, मा. जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, मा. अतिरिक्त आयुक्त श्री. संजय हेरवाडे, मा. प्रांताधिकारी श्री. शेखर घाडगे, मा. तहसीलदार श्री. अविनाश कोष्टी, मा. माजी महापौर श्री. राजीव पाटील, मा. माजी महापौर श्री. नारायण मानकर, मा. माजी उपमहापौर श्री. प्रकाश रॉड्रीग्ज, तसेच वसई विजय स्मारक समितीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक-नगरसेविका, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसईच्या शौर्यगाथेला उजाळा देणारा हा विजयोत्सव, इतिहासाच्या आठवणींना सन्मानपूर्वक उजाळा देत, भावी पिढीला प्रेरणा देणारा ठरला.
What's Your Reaction?






